कणकवली : वैभववाडी नगरपंचायतीचे भाजपाचे विद्यमान उपनगराध्यक्ष संजय दिगंबर सावंत यांनी निवडणूकीच्या शपथपत्रात महत्वपूर्ण माहिती लपवून निवडणूक जिंकली. तसेच सदस्य काळात अनधिकृत बांधकाम केले. त्यामुळे त्यांचे नगरसेवकपद रद्द करावे, यासाठी सावंत यांचे प्रतिस्पर्धी उद्धवसेनेचे उमेदवार शिवाजी सखाराम राणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अपात्रता अर्ज दाखल केला होता. जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी तो फेटाळला आहे. सन २०२१-२२ मध्ये वाभवे-वैभववाडी नगरपंचायत निवडणूकीत संजय सावंत व शिवाजी राणे यांच्यात प्रभाग क्र. १३ मधून लढत झाली होती. यात संजय सावंत हे विजयी झाले होते. त्यानंतर माहितीच्या अधिकारात संजय सावंत यांच्याविषयी माहिती मिळवून राणे यांनी वाभवे येथील घर नं. ३४ च्या दुसऱ्या मजल्याचे बांधकाम संजय सावंत यांनी नगरसेवक कारकिर्दीत अनधिकृतपणे केले. निवडणूकीवेळी दाखल केलेल्या शपथपत्रात शासनाकडे अनधिकृत बांधकामाबाबत भरलेल्या दंडाचा व अनधिकृत बांधकामाचा उल्लेख केलेला नव्हता.तसेच नगरपंचायतीचे मुख्याधिकारी १९ जुलै २०२३ रोजी सादर अहवालात घर नं. ३४ चे बांधकाम विनापरवाना असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे त्यांना अपात्र ठरवून नगरसेवकपद रद्द करावे व अनधिकृत बांधकाम काढून टाकण्याची कार्यवाही करावी, असा अर्ज दाखल केला होता.याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे झालेल्या सुनावणीअंती कलम ४४ ई प्रमाणे नगरसेवकाने त्याच्या कारकिर्दीत ते बांधकाम केल्याचा पुरावा समोर न आल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी तो अर्ज फेटाळून लावला आहे.संजय सावंत यांच्यावतीने अॅङ उमेश सावंत यांनी काम पाहिले.
वैभववाडीचे उपनगराध्यक्ष संजय सावंत यांचे नगरसेवक पद अबाधित!, विरोधातील अपात्रता अर्ज फेटाळला
By सुधीर राणे | Published: July 15, 2024 5:45 PM