सावंतवाडी : वाळू पट्टे लिलावावरून सुरू असलेले आंदोलन हे पालकमंत्री दीपक केसरकर यांचे अपयश आहे. आपणास काळे झेंडे दाखवले म्हणून त्याचा असा राग काढत असतील तर ते योग्य नाही. शिवसेना-भाजपचे पदाधिकारी फक्त विषय समजावून घेण्यापूर्वी त्यात ढवळाढवळ करत आहेत. मलेशियाची वाळू जिल्ह्यात आणून जिल्ह्याची अधोगती करायची आहे का? असा सवाल महाराष्ट्र स्वाभिमानचे नेते माजी खासदार निलेश राणे यांनी केला. ते सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी तालुकाध्यक्ष संजू परब, नगरसेवक राजू बेग, सभापती पंकज पेडणेकर, उपसभापती संदीप नेमळेकर, सुधीर आडिवरेकर, विनायक ठाकूर, बांदा उपसरपंच अक्रम खान, दिलीप भालेकर आदी उपस्थित होते.यावेळी राणे म्हणाले, नारायण राणे पालकमंत्री असताना कधी सिंधुदुर्गमध्ये वाळूसाठी आंदोलने होत नव्हती. पण आता सतत आंदोलने सुरू आहेत. पालकमंत्र्यांसह शिवसेना, भाजपच्या नेते मंडळींना प्रशासनातील काही समजत नाही. त्यामुळे एखादा विषय वाढत जात आहे. वाळू आंदोलन चिघळण्यामागे पालकमंत्री दीपक केसरकर हेच जबाबदार आहेत. त्यांना वाळूवाल्यांनी गेल्यावर्षी काळे झेंंडे दाखवले. त्याचा ते राग काढत आहेत. त्यामुळेच वाळू पट्टे लिलाव थांबले आहेत. असा राग काढणे योग्य नाही. पण मंत्री केसरकर यांची ही जुनी सवय आहे, अशी टीका यावेळी माजी खासदार राणे यांनी केली आहे. आता वाळू पट्टे लिलावाचा विषय मार्गी लावला आहे. मेरीटाईम बोर्डाचे सीईओ विक्रम कुमार यांनी यात लक्ष घातल्याने आता लिलाव प्रकिया जलद होईल. हा प्रश्न मी मार्गी लावला आहे. म्हणून श्रेय घेणार नाही. वाळू सुरू होणे महत्त्वाचे आहे, असे यावेळी राणे यांनी स्पष्ट केले.मच्छीमार आंदोलनात पालकमंत्री केसरकर यांनी चार दिवसांपूर्वी फक्त चर्चा केली. त्यावर उपाययोजना केल्या नाहीत. मग मार्ग कसा काय निघू शकतो? मच्छीमार आंदोलनात गोव्याची सरळ भूमिका आहे. गोवा शासन महाराष्ट्राच्या अन्न-औषध प्रशासनासोबत चर्चा करण्यास तयार आहे. पण मंत्री केसरकर हे त्यांच्या संपर्कात राहत नाहीत, असे खुुद्द गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे आपल्याशी बोलले असल्याचे माजी खासदार राणे यांनी सांगितले. मी शनिवारी सायंकाळी गोव्यात त्यांची भेट घेतल्याचेही राणे यांनी सांगितले.राणे कुटुंबावर टीका करणा-या माजी आमदार परशुराम उपरकर यांचे कर्तृत्व काय? असा सवाल माजी खासदार राणे यांनी केला आहे. स्वत:च्या जीवावर पाच ग्रामपंचायत जिल्ह्यात ते निवडून आणू शकले नाहीत. त्यांनी राणेंवर टीका करावी यात दुर्दैव ते काय आणि राणे यांनी कधीही उपरकर यांना पक्षात येण्याचे निमंत्रण दिले नव्हते, असेही राणे यांनी सांगितले.
काळे झेंडे दाखवल्याचा राग काढतात; निलेश राणेंचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 10:21 PM