दोडामार्ग (सिंधुदुर्ग) : सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्यांत घनदाट जंगलामध्ये वसलेल्या कुंभवडे या गावात दुर्मीळ असलेल्या ‘ब्लॅक पँथर’चे अस्तित्व पुन्हा एकदा पाहावयास मिळाले आहे. आठ महिन्यांपूर्वी तेरवण-मेढे परिसरातही ब्लॅक पँथर पाहावयास मिळाला होता. त्यामुळे सह्याद्री डोंगररांगात ब्लॅक पँथरचे अस्तित्व अधोरेखित झाले आहे.कळणे येथील दर्शन देसाई हे काही कामानिमित्त कुंभवडे ते चंदगड असा प्रवास करत असताना त्यांना कुंभवडेमधील जंगल भागात हा दुर्मीळ ब्लॅक पँथर पाहावयास मिळाला. वाहन आल्याचे पाहताच ब्लॅक पॅंथर झुडपांमध्ये लपू लागला. यावेळी दर्शन देसाई यांनी त्या ब्लॅक पँथरची छबी आपल्या मोबाइलमध्ये कैद केली.जैवविविधता अधोरेखितमार्च महिन्यातही तेरवण, मेढे येथील जंगलात ‘वाईल्ड वन’ या नावाने प्राणी व पक्षी अभ्यासकांसाठी उभारलेल्या इमारतीच्या परिसरात ब्लॅक पँथर दृष्टीस पडल्याची घटना घडली होती. सह्याद्रीच्या डोंगररांगात पुन्हा एकदा ब्लॅक पँथरचे दर्शन झाल्याने येथील जैवविविधता अधोरेखित होत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळला 'ब्लॅक पँथर', सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यात अस्तित्व अधोरेखित
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: November 26, 2024 7:18 PM