कुडाळ - सहयाद्री पट्ट्यात “ब्लॅक पॅथर” चा अधिवास असल्याचे काल, गुरूवारी अखेर उघड झाले आहे. तालुक्यातील गोवेरी गावात गुरूवारी दिड ते दोन वर्षाचे पिल्लू आढळून आले. ते पिल्लू परिसरात राहणार्या तुकाराम राऊळ यांच्या आंबा-बागेत असलेल्या सात ते आठ ते फुट खोल टाकीत आढळून आले. दरम्यान त्या पिल्लाला बाहेर काढून वनअधिकार्यांनी नैसगिक अधिवासात सोडले.
यावेळी उपवनसंरक्षक सावंतवाडी शहाजी नारनवर व सहाय्यक वनसंरक्षक (खाकुतो व वन्यजीव) आय. डी. जालगावकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, कुडाळ अमृत शिंदे, वनपाल नेरूर त हवेली धुळु कोळेकर, वनपाल मठ अ. स. चव्हाण, वनपाल मालवण श्रीकृष्ण परीट, वनरक्षक नेरूर त हवेली सावळा कांबळे, वनरक्षक मठ सुर्यकांत सावंत, वाहनचालक राहुल मयेकर, स्थानिक ग्रामस्थ दत्ताराम गावडे, सुशांत गावडे, बाळू खानोलकर, विश्वजित खानोलकर, अनंत राऊळ, ओंकार जाधव, सतीश गावडे आदी उपस्थित होते.
पाणाच्या टाकीत दोन दिवसांपासून बिबट्याचे पिल्लू पडल्याची माहिती वनविभागाला मिळाली. वनकर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन या बिबट्याची पाहणी केली तेव्हा तो दुर्मीळ काळा बिबट्या असल्याचे लक्षात आले. या ब्लॅक पँथरला टाकीबाहेर काढण्यात वन विभागाला यश आले. दुर्मीळ काळ्या बिबट्याचे हे पिल्लू नर असून ते साधारण एक ते सव्वा वर्षाचे आहे. सिंधुदुर्गातून प्रथमच काळ्या बिबट्याची सुटका करण्यात आली आहे. त्याची आईही जवळपास असण्याची शक्यता आहे. या ब्लॅक पँथरचे दर्शन घडवणारा एक व्हिडिओ देखील वनकर्मचाऱ्यांनी रेकॉर्ड केला आहे. कोल्हापूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक डॉ. क्लेमेन्ट बेन यांनीही हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे.
जिल्ह्यात प्रथमच दुर्मीळ काळ्या बिबट्याचे (ब्लॅक पँथर) दर्शन झाल्याने वन्यजीव प्रेमी उत्साहीत झाले आहेत. कुडाळनजीकचा परिसर जंगलांनी वेढलेला आहे. त्यामुळे इथं अनेक वन्य जीव वास्तव्यास आहेत. यामुळेच ब्लॅक पँथरचं दर्शन घडलं असावे, असे वन्यजीव प्रेमींना वाटत आहे.
ब्लॅक पँथर किंवा काळा बिबट्या
मेलॅनिस्टिक बिबट्यांना सामान्यतः ब्लॅक पँथर किंवा काळा बिबट्या म्हणतात. याला मोगली जमीन असेही म्हटले जाते. ब्लॅक पँथर पश्चिम घाट आणि ईशान्य भारताच्या जंगलात आढळतात. मेलेनिस्टिक बिबट्या कोकण प्रदेश, गोवा आणि कर्नाटकात आढळतात. त्यांच्या शरीरात जास्त मेलेनिन असते. त्यांच्या फरचा रंग निळा, काळा, राखाडी आणि जांभळ्या रंगाचे मिश्रण आहे.