कणकवली : शहरात ठिकठिंकाणी लावण्यात आलेले फलक नगरपंचायतीने उतरवले. शनिवारी कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देणाऱ्या फलकांनी शहरातील मोक्याच्या जागा पटकावल्या होत्या. त्यामुळे वाहनधारकांना आणि पादचाऱ्यांनीही काही वेळा त्रासाला सामोरे जावे लागते. यापैकी बहुतांश फलक हे परवानगी न घेताच लावलेले होते. त्यामुळे नगरपंचायतीने अशा फलकांवर कारवाई केली. महामार्गावरील मुख्य चौकापासून श्रीधर नाईक पुतळ्यापर्यंत ही कारवाई करण्यात आली. शिवाजी चौकापर्यंत तब्बल दोन ट्रॅक्टर भरून फलक उतरवण्यात आले. अनधिकृत फलक लावणाऱ्यांमध्ये राजकीय पदाधिकाऱ्यांचा जास्त भरणा दिसतो. नगरपंचायतीने फक्त फलक उतरवण्याची कारवाई केली. नगरपंचायतीचे मनुष्यबळ कामाला लागले. मात्र, फलक लावून जाणाऱ्यांना अद्याप दंडात्मक कारवाई होत नसल्याने वारंवार विनापरवाना फलक लावले जात आहेत. कणकवली शहर हे मुंबई-गोवा महामार्गावरील महत्वाचे शहर असल्याने या ठिकाणी राजकीय नेतेमंडळी सण, उत्सवाच्या निमित्ताने मोठ्या संख्येने बॅनरबाजी करताना आढळतात. त्यामुळे मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनांसाठी हे फलक त्रासाचे ठरत होते. (प्रतिनिधी)
कणकवलीतील फलक उतरवले
By admin | Published: September 19, 2015 11:44 PM