सावर्डे : जन्मजात दृष्टीहीन असलेल्या अपंगत्त्वावर मात करून जीवनाचे रडगाणे न गाता गाण्यातून जीवन जगणाऱ्या अंध व्यक्ती या डोळे असणाऱ्या लोकांना संघर्षासाठी नवी उमेद देणारी आहे, मात्र आमचे जीवनच संघर्षासाठी आहे, असे प्रतिपादन स्नेहज्योती अंधशाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा सेनगुप्ता यांनी स्व. गोविंदराव निकम जयंती महोत्सव कार्यक्रमप्रसंगी पुरस्कार स्वीकारताना भावनिक उद्गार काढले.स्व. गोविंदराव निकम यांच्या कार्याचा वसा पुढे अविरत चालू राहावा, समाजातील वंचित घटकांना समाजापुढे आणून त्यांच्या जीवनात आनंद द्वीगुणित करावा, त्यांना आधार द्यावा, या प्रमुख उद्देशाने सह्याद्री शिक्षण संस्था गेली पाच वर्षे समाजातील भरीव योगदान देणाऱ्या संस्था व व्यक्तिला गोविंदराव निकम यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सह्याद्री पुरस्कार देऊन गौरव करते. मंडणगड येथील स्नेहज्योती अंध शाळेला विश्वास मेहंदळे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष शेखर निकम, माजी आमदार निशिकांत जोशी, चित्रा वाघ आदींची उपस्थिती होती.मंडणगड तालुक्यातील घराडीसारख्या अतिशय दुर्गम भागात १३ वर्षांपूर्वी किन्हेरे भगिनींनी केवळ ४ मुलांवर स्थापन केलेल्या अंध मुलांच्या शाळेत आज १०० हून अधिक विद्यार्थी घडत आहेत. जन्मत:च अपंगत्व आलेल्या व्यक्तिला दृष्टी असणाऱ्या व्यक्तीपेक्षा सरस घडवणे, त्यांचे पालन पोषण करणे, त्यांच्यातील असणाऱ्या कलेला वाव देणे, हे काम समाजासाठी प्रेरणादायी आहे. आपल्या आईच्या स्मृतिप्रित्यर्थ स्थापन केलेल्या स्नेहज्योती विद्यालयाला अनुदान मिळावे, यासाठी किन्हेरे भगिनी १३ वर्षांपासून आजही शासनाचे उंबरठे झिजवत आहेत, ही शोकांतिका आहे. आज मुलांचे पालनपोषण करणे, ही बाब मन थक्क करणारी आहे. अंधांचे जीवन घडवणे, त्यांच्यातील कलागुण हेरून त्यांना प्रोत्साहन देणे, हे काम येथील मुख्याध्यापिका प्रतिभा सेनगुप्ता व मनीष व्याग्रबर करत आहेत. (वार्ताहर)आज शासनकर्त्यांना अशा सेवाभावी संस्थांकडे पाहायला वेळ नाही. मुख्यमंत्री, मंत्री, खासदारांचे दौरे होतात, परंतु अशा अंध मुलांचे जीवन प्रकाशमय करणाऱ्या सामाजिक संस्थेकडे बघण्यासाठी या राज्यकर्त्यांना वेळ नाही, हीच पुरोगामी महाराष्ट्राची शोकांतिका आहे.- मनीष व्याग्रबर, कार्यवाहकिन्हेरे भगिनींचे योगदानकिन्हेरे भगिनींनी सामाजिक जाणीव ओळखून अंध मुलांचे पुढील आयुष्य सुखकर होण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांची बँकेत खाती उघडली. संस्थेला मिळणाऱ्या मदतीमधील काही रक्कम या विद्यार्थ्यांच्या बचत खात्यावर महिन्याला भरुन त्यांच्या पुढील आयुष्याला मोठा हातभार लावण्याचा प्रयत्न केला आहे.
अंध व्यक्ती संघर्षासाठी नवी उमेद देणारी
By admin | Published: January 19, 2016 12:01 AM