देवगड : देवगड समुद्रात १० वाव पाण्यात तुषार दिगंबर पारकर यांच्या मालकीची ‘विशाखा’ ही नौका बुडाली. या नौकेवरील ८ पैकी ७ खलाशांना वाचविण्यात यश आले असून, एक खलाशी अद्याप बेपत्ता आहे. नितीन जयवंत कणेरकर (४३, रा. कणेरी, राजापूर) असे त्याचे नाव आहे. ही घटना रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली.उपलब्ध माहितीनुसार, देवगड बंदरातील तुषार पारकर यांची ‘विशाखा’ ही नौका मच्छिमारीसाठी रविवार, ३१ मार्च रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास देवगड बंदरातून समुद्रात जाण्यासाठी निघाली होती. देवगड किल्ल्यासमोर १० वाव पाण्यात बोटीच्या तळातील जॉईंटच्या फटीमधून पाणी आत येऊ लागल्याने बोट बुडू लागली. बोट बुडत असल्याने बोटीवरील तांडेल व खलाशी यांनी पाण्याचे कॅन रिकामे करून जीव वाचविण्यासाठी समुद्राच्या पाण्यात उडी मारली. याच दरम्यान मच्छिमारीसाठी गेलेल्या अनंत नारकर यांच्या ‘इंद्रायणी’ या नौकेवरील तांडेल व खलाशी यांनी बुडत असलेल्या बोटीवरील खलाशांना वाचविले. मात्र, या बोटीवरील नितीन कणेरकर यांच्या हातातील कॅन सुटल्याने ते पाण्यात बेपत्ता झाले.या घटनेची माहिती मालक तुषार पारकर व देवगड पोलिस यांना मिळताच स्थानिक मच्छिमारांच्या सहाय्याने व पोलिस गस्ती नौका ‘पंचगंगा’च्या सहाय्याने बेपत्ता खलाशाची शोधमोहीम दिवसभर सुरू होती. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत ते सापडले नव्हते.
नौकेचे नुकसानया दुर्घटनेत जाळ्यांसहित नौकेला जलसमाधी मिळाल्याने तुषार पारकर यांचे सुमारे २० लाखांचे नुकसान झाले आहे. पोलिसांच्या ‘पंचगंगा’ गस्ती नौकेतून पोलिस उपनिरीक्षक सोलकर, तांडेल, दरवेश, शकील अहमद, एएसआय चंदनशिवे, पोलिस शिपाई देवेंद्र मुंबरकर यांनी शोधमोहीम राबविली. अधिक तपास देवगड पोलिस ठाण्याचे हवालदार उदय शिरगावकर करत आहेत.