मालवण : तारकर्ली समुद्रकिनारी पर्यटनाचा आनंद लुटत असताना शनिवारी सायंकाळी समुद्रात प्रवीण भास्कर अरबट (२४, नवी मुंबई ऐरोली, मूळ अकोट, अकोला), व वैभव बबनराव गावंडे (२३, घणसोली-ठाणे, मूळ अमरावती) हे बुडून बेपत्ता झाले होते. रविवारी दुपारी दोघाही पर्यटकांचे मृतदेह तारकर्ली-वायरी समुद्रात सापडून आले. स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने पोलीस प्रशासनाने ही शोधमोहीम राबवत मृतदेहांचा शोध घेतला. मुंबई येथे सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कामास असलेला राधेश्याम डिके हा आपले दोन मित्र प्रवीण अरबट व वैभव गावंडे यांच्यासमवेत मालवण येथे पर्यटनसाठी आले होते. राधेश्याम याचा मित्र आशिष धाकडे (कणकवली) याच्याकडे हे तिघे मित्रमंडळी शनिवारी सकाळी उतरले होते. त्यानंतर ते आशिष याचा सहकारी मित्र सचिन लोहारे (कणकवली) असे पाचजण मिळून मालवणला आले. आशिष याने आपला मित्र महेश भांगरे (आचरा) याला आपल्या सोबत फिरायला बोलवले. त्यानंतर हे सहाही मित्र मालवण येथील किल्ले सिंधुदुर्गचे दर्शन करून तारकर्ली येथे पर्यटनासाठी आले. यातील राधेशाम, प्रवीण व वैभव समुद्रात समुद्रस्नानाचा आनंद लुटत होते. मात्र, समुद्राला अमावस्या असल्याने उधानसदृश स्थिती असल्याने ते पाण्यात खेचले जाऊ लागले. यात राधेश्याम बचावला. मात्र, वैभव व प्रवीण समुद्रात बुडून बेपत्ता झाले. सायंकाळी उशिरापर्यंत त्यांचा शोध लागला नव्हता. दरम्यान, पर्यटक बुडाल्यानंतर त्यांना वाचविण्यासाठी तारकर्ली-एमटीडीसी येथे इंग्लंड येथून आलेला विदेशी पर्यटक आपल्या जीवाची पर्वा न करता थेट समुद्रात झेपावला. सुमारे तासभर तो समुद्रातच होता. मात्र त्याला प्रवीण व वैभव दिसून आले नव्हते. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडून वेळोवेळी रंगीत तालीम घेण्यात येते. मात्र, अपघात घडल्यास सुरक्षा यंत्रणा व आपत्ती व्यवस्थापनाचा पत्ताच नसतो. शनिवारी सायंकाळी तारकर्ली समुद्रात अपघात घडल्यानंतर व्यवस्थापन न पोहोचल्याने ग्रामस्थ व बुडालेल्या पर्यटकांच्या सहकाऱ्यात नाराजी होती. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने शोधमोहीम राबविली. जीवरक्षक व आपत्तीच्या वेळी समुद्रात तत्काळ उतरण्यास बोटीची व्यवस्था कधी केली जाणार ? शासन-प्रशासन याकडे गांभीर्याने पाहणार की नाही? अजून किती पर्यटकांचे जीव प्रशासन घेणार असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत.दरम्यान, या प्रकाराबाबत मच्छिमारांनी नाराजी व्यक्त करत सुरक्षा यंत्रणेबाबत कार्यवाही न झाल्यास आंदोलनाची भूमिका घेतली जाईल, असा इशारा दिला आहे. (प्रतिनिधी)मच्छिमारांच्या मदतीने शोधमोहीमबेपत्ता प्रवीण व वैभव यांचे नातेवाईक मालवणात दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी दांडी येथील अन्वय प्रभू, भाई जाधव, भाई रोगे, दिलीप घारे, पिंकू जोशी, नाना रोगे, नारायण आडकर या स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने पोलीस कर्मचारी धोंडीराम जानकर, विजय धुरी, व्ही. डी. जोशी यांच्या पथकाने तारकर्ली समुद्रात होडीतून शोधमोहीम राबविली. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास तीन ते चार वाव खोल समुद्रात प्रवीण याचा मृतदेह तरंगताना दिसून आला. त्यानंतरही वैभव याचा मृतदेह शोधण्याची मोहीम तीन ते चार तास देवबाग, तारकर्ली, वायरी समुद्रात सुरु होती. मात्र, वैभव याचा काहीच पत्ता लागला नव्हता. त्यानंतर सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास तारकर्ली-वायरी किनाऱ्यालगत वैभव याचा मृतदेह सापडून आला.
बेपत्ता पर्यटकांचे मृतदेह सापडले
By admin | Published: September 13, 2015 9:39 PM