देवरूख/आरवली : संगमेश्वर तालुक्यातील राजवाडी येथे कोकण रेल्वे रुळावर राजवाडी येथील स्वप्नील शांताराम गुरव (वय २५) व तांबेडी येथील स्वप्नाली बाळकृष्ण सांगळे (१८) या दोघांचे मृतदेह शनिवारी सकाळी आढळले. रेल्वेखाली सापडल्यानेच दोघांचा मृत्यू झाला की त्यांनी आत्महत्या केली, तसेच हा अपघात होता की घातपात, याबाबत गूढ आहे. राजवाडीतील स्वप्नील गुरव तळोजा मुंबई येथे कामाला होता, तर तांबेडी येथील स्वप्नाली सांगळे हीदेखील मुंबई येथे राहात होती. शनिवारी सकाळी कोलाड ते सुरतकल ही मालवाहू रेल्वेगाडी नेणाऱ्या चालकाला राजवाडी येथे रूळावर दोन मृतदेह दिसले. त्यांनी तत्काळ याबाबत बेलापूर रेल्वे स्टेशन व रेल्वे पोलिसांशी संपर्क साधून या मृतदेहांची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळावरील मृतदेह बाजूला केले. ही घटना शनिवारी सकाळी ७च्या सुमारास निदर्शनास आली. या घटनेबाबत स्टेशन मास्तर विलास पवार यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात खबर दिली. अपघाताची माहिती मिळताच संगमेश्वर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मनोहर चिखले, उपनिरीक्षक मोहन पाटील घटनास्थळी आले. ग्रामस्थांनीही घटनास्थळी धाव घेतली. याठिकाणी मिळालेल्या साहित्यावरून (पर्स व पॉकीटमधील कागदपत्र) या दोघांची ओळख पटली. यानंतर हा प्रकार नातेवाइकांच्याही कानी घालण्यात आला. स्वप्नील व स्वप्नाली यांचे मृतदेह संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात विच्छेदन करून नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. सायंकाळी उशिरा या दोघांच्याही पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणाचा अधिक तपास हेड कॉन्स्टेबल एच. आर. नलावडे करीत आहेत. (प्रतिनिधी) मृत्यूचे गूढ स्वप्नील व स्वप्नाली या दोघांच्या मृत्यूबाबतचे गूढ कायम असून, हा अपघात, घातपात की आत्महत्या? हे प्रश्न अनुत्तरितच आहेत. हा अपघात असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. अधिक तपासानंतर या घटनेची उकल होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. मृतदेह छिन्नविच्छिन्न या दुर्घटनेत स्वप्नालीच्या डोक्याचे दोन भाग झाले, तर स्वप्नीलच्या हातांची अवस्थाही साधारण तशीच झाली होती. दोन्ही मृतदेह रेल्वे रूळांच्या मध्ये असल्यामुळे आणि त्यांच्या मृतदेहांची स्थिती लक्षात घेता या दोघांचा मृत्यू रेल्वेच्या धडकेनेच झाला असल्याचाही निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे.
राजवाडीतील रूळावर तरुण-तरुणीचा मृतदेह
By admin | Published: June 07, 2015 12:50 AM