आंबोली (सिंधुदुर्ग) : येथील खोलदरीत कोसळलेला मृतदेह बाहेर काढण्यास सावंतवाडी पोलिसांना यश आले आहे. मात्र तो युवक कोण, कुठून आला होता हे शोधणे पोलिसांसमोर आव्हान आहे. दोन दिवसांपूर्वी हा प्रकार घडला, असावा असा अंदाज पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान त्या अज्ञात व्यक्तीची आत्महत्या की, घातपात हे मात्र शवविच्छेदनानंतर कळणार आहे. परंतु तूर्तास तरी त्याच्या अंगावर कोणत्याही जखमा नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सावंतवाडी व आंबोली पोलिसांच्या टीमसह रेस्क्यू टीमच्या मदतीने सकाळी आठ वाजल्यापासून मदत कार्य सुरू करण्यात आले. आंबोली रेस्क्यू टीमच्या साह्याने तेथील पोलिस सुरज पाटील, दत्ता देसाई, मनीष शिंदे, दीपक शिंदे आदी सहकारी खोल दरीत उतरले. यावेळी झुला करून दरीत असलेला मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. तुर्तास तरी पडल्याची खुण वगळता मृतदेहाच्या अंगावर कोणत्याही जखमा नाहीत. त्यामुळे घातपाताचा संशय नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र नेमके कारण शवविच्छेदनानंतर स्पष्ट होणार आहे. तो मृतदेह सांगेली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला आहे. मृत युवक नेमका कुठचा, कशासाठी आला होता याचा तपास करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने तपासाची सूत्रे फिरवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आंबोली दरीतून बाहेर काढला मृतदेह, ओळख पटविण्याचे आव्हान; शवविच्छेदनानंतर नेमके कारण स्पष्ट होणार
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: June 21, 2023 11:37 AM