गुहागर : पंचायत समिती, गुहागरचे मिशन बंधारे २०१५ ‘पाण्यासाठी श्रमदान - एक चळवळ’ हे अभियान यशस्वी झाले आहे. गुहागर तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतीमध्ये ४६५ बंधारे बांधण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, अभियानाच्या समाप्तीअखेर ४६९ बंधारे बांधून पूर्ण झाले आहेत. ‘नरेगा’मधून २०११ साली १७ लाख रुपये खर्च करुन २७० वनराई बंधारे बांधण्यात आले होते. आता शासनाचा कोणताही खर्च न होता केवळ श्रमदानातून ४६९ बंधारे उभारण्यात आले आहे. त्यामध्ये ९१ वनराई, २२२ विजय व १५६ कच्च्या बंधाऱ्यांचा समावेश असून, या बंधाऱ्यामुळे सुमारे ३९ कोटी लीटर पाणी अडवण्यात आले आहे. या बंधाऱ्यांसाठी २० लाख रुपयांचे काम झाले असून, यासाठी २७ हजार लोकांनी श्रमदान केले आहे. बंधाऱ्यांमुळे ७९ नळपाणी पुरवठा योजनांतील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने पाणीटंचाईवर मात करणे शक्य होणार असून, या बंधाऱ्यांतील पाण्याचा ५३ हेक्टर क्षेत्रावरील सिंचनासाठीही फायदा होणार आहे.पंचायत समिती, गुहागर तसेच कृ षी विभागाच्या वतीने २ आॅक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त जानवळे येथे माजी सभापती राजेश बेंडल व तत्कालीन उपसभापती व विद्यमान सभापती सुरेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला होता. गेले दोन महिने पंचायत समितीचे पदाधिकारी, गटविकास अधिकारी यांच्या पाठपुराव्याने या अभियानाला गती मिळाली. सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक, पंचायत समितीचे व कृ षी विभागाचे अधिकारी, कृषी विस्तार अधिकारी, कृ षी पर्यवेक्षक, कृ षी सहाय्यक यांच्यासह बचत गट, महिला मंडळ व ग्रामस्थांनी या अभियानात उत्स्फूर्त सहभाग घेतला. दोन महिन्याच्या कालावधीत ४६९ बंधारे बांधून पूर्ण झाल्याने श्रमदानाची ही चळवळ यशस्वी ठरली आहे.वनराई बंधारे बांधण्यासाठी ४,०७,६८० रुपये मजुरी व १,०१,९२० रुपयांचे साहित्य असे एकूण ५,०९,६०० रुपयांचे काम झाले आहे, तर विजय बंधाऱ्यासाठी ८,३९,१६० रुपये मजुरी व २,४८,६४० रुपयांचे साहित्य असे एकूण १०,८७,८०० रुपयांचे काम आणि कच्चे बंधाऱ्यासाठी केवळ मजुरी रक्कम ३,९३,१२० रुपये रक्कम खर्च झाली आहे. गुहागर तालुक्यात बांधण्यात आलेल्या ४६९ बंधाऱ्यासाठी १६,३९,९६० रुपये मजुरीसाठी व ३,५०,५६० रुपये साहित्यासाठी असे एकूण १९,९०,५२० रुपयांच्या मुल्यांकनाचे काम या मिशन बंधारेमधून झाले आहे.सन २०११-१२ व २०१२-१३ या वर्षांमध्ये राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वनराई बंधारा बांधण्याचा निर्णय तत्कालीन जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतला होता. त्यावेळी या योजनेतून गुहागर तालुक्यात केवळ २७० वनराई बंधारे बांधण्यात आले होते. त्यासाठी मजुरीचा खर्च १०,१४,४६७ रुपये व साहित्याचा खर्च ६,८०,७१५ रुपये असे एकूण १६,९५,१८२ रुपये खर्च करण्यात आले होते. म्हणजेच ‘नरेगा’तून शासनाचे पैसे खर्च करुन जेवढा परिणाम झाला त्यापेक्षाही शासनाचा पैसा खर्च न करता श्रमदानाचे महात्मा फुले जलभूमी संधारण अभियान प्रभावी आणि यशस्वीही झाले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी हे अभियान राबविण्यासाठी पुढाकार घेतला होता. (प्रतिनिधी)तालुक्यात ६५ ग्रामपंचायती : बागांच्या सिंचनासाठी लाभदायकगुहागर तालुक्यात ६५ ग्रामपंचायती असून, प्रती ग्रामपंचायत सरासरी ७ बंधारे बांधण्यात आले आहेत. तालुक्यात बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यांचा उपयोग ४६ नळपाणी पुरवठा योजनेच्या विहिरीसाठी, १ पिण्याच्या पाण्याच्या तळीसाठी व ३२ पिण्याच्या पाण्याच्या विहिरींसाठी असा एकूण ७९ पिण्याच्या पाण्याचा स्त्रोतांवर याचा चांगला परिणाम झाला आहे. या व्यतिरिक्त सुमारे १६० ते १७० खासगी विहिरींनासुद्धा या बंधाऱ्यांचा उपयोग झाला आहे. सुमारे ५३ हेक्टर क्षेत्रावरील भाजीपाला, कडधान्य, नारळ, सुपारीच्या बागांच्या सिंचनासाठी हे बंधारे लाभदायक ठरले आहेत.
२७ हजार ग्रामस्थांच्या श्रमदानातून बंधारे
By admin | Published: January 09, 2016 12:07 AM