सावंतवाडी : तळवडेतील एका बँकेची नकली दागिने ठेवून फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघा संशयितांना येथील न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
खोटे दागिने गहाण ठेवून संबंधित एका महिलेने साडेचार लाखांचे कर्ज उचलले, तर त्यासाठी एका सोनाराने दागिने खरे असल्याचा अहवाल दिला होता,असे बँकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे होते.त्यानुसार ५ मार्चला सावंतवाडी पोलीस ठाण्यात दोघाही संशयितांविरुद्ध फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.याबाबत अधिक माहिती अशी की,यातील एका संशयित महिलेने बँकेकडे कर्जाची मागणी केली होती. त्या बदल्यात सोन्याचे दागिने गहाण ठेवले. त्यासाठी संबंधित सोनाराने ते दागिने खरे असल्याचा अहवाल बँकेला दिला होता. त्यानुसार दागिने ठेवून साडेचार लाखांचे कर्ज घेतले. मात्र ते दागिने बनावट असल्याचे लक्षात येताच बँक अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.दरम्यान शुक्रवारी त्यांना ताब्यात घेऊन येथील न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. याबाबतचा अधिक तपास सावंतवाडी पोलीस करीत आहेत.