सुधीर राणे -
कणकवली : कणकवली शहरानजीक असलेल्या वागदे - गोपुरी आश्रमाजवळील शासकीय दूध डेअरी आता शेवटच्या घटका मोजत आहे. अनेकांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या या दूध प्रक्रिया प्रकल्पाकडे लोकप्रतिनिधिंचे अक्षम्य असे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या शासकीय डेअरीचे कामकाज गेल्या ५ वर्षांपासून पूर्णपणे ठप्प झाले असून तेथील कोट्यवधींची मशिनरी गंजली आहे. यामुळे सिंधुदुर्गच्या दुग्धक्रांतीला एकप्रकारे 'ब्रेक' च लागला असून या शासकीय डेअरीला आता नवसंजीवनीची गरज आहे.
२६ डिसेंबर १९६६ रोजी कणकवली शासकीय दूध डेअरीची स्थापना करण्यात आली. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून या डेअरीत दूध संकलन केले जात असे. ज्यावेळी शिवसेना - भाजप युतीचे शासन पहिल्यावेळी राज्यात आले. त्यावेळी कोकणचे सुपुत्र असलेले नारायण राणे दुग्धविकास मंत्री झाले. त्यांच्या कार्य काळात सुमारे ४ कोटी रुपये खर्च करून वागदे येथे शासकीय दूध डेअरीची अद्ययावत इमारत उभारण्यात आली.
तसेच केंद्र शासनाच्या एकात्मिक दूग्ध विकास योजनेंतर्गत शेतकर्यांना दूधाळ जनावरे अनुदान तत्वावर वाटप करण्यात आली होती. सिंधुदुर्गचे दुग्धोत्पादन वाढवून शेतकर्यांची आर्थिक उन्नती व्हावी व त्यानिमित्ताने जिल्ह्यात दुग्धक्रांती व्हावी . हा त्यामागचा प्रमुख उद्देश होता. नवीन डेअरीमध्ये अद्ययावत दूध पॅकिंग मशीन, दूध निर्जंतुकीकरण, दूध एकजिवीकरण, दूध शीतकरण, ५ टनाचा बर्फ कारखाना, प्रत्येकी ५ हजार लिटरच्या दूध संकलनासाठी ४ टाक्या, दहा मोठ्या गाड्या, दोन जीप, १० हजार व्हॅटचा जनरेटर अशा अनेक सुविधा निर्माण करण्यात आल्या होत्या. तर दूग्धशाळा व्यवस्थापक, १२ पर्यवेक्षक, ३३ मजूर, पहारेकरी व कार्यालयीन कर्मचाऱ्यांसह एकूण ७४ कर्मचारी येथे कार्यरत होते.
' आरे ' ब्रॅण्डच्या नावाखाली ग्राहकांना या डेअरीतून दर्जेदार दूध मिळत असे. या डेअरीमध्ये दरदिवशी अडीच ते तीन हजार लीटर आरे ब्रॅण्डचे पॅकिंग होत होते. सन २०१३ पर्यंत या डेअरीत १० ते १२ हजार लीटर दूध संकलन होत होते. गावागावात ११० दुग्धविकास संस्था कार्यरत होत्या. या दूध संस्थांमार्फत गावागावात गाड्या पाठवून दूधाचे संकलन केले जात असे. तसेच मिरज, चिपळूण आदी शासकीय डेअरीतून दूध आणले जात असे.
त्यावेळी आरे ब्रॅण्ड दूधाबरोबरच सुगंधीत दूध, पेढे, तूप, श्रीखंड, आम्रखंड असे दुग्धजन्य पदार्थ देखील तयार करून विकले जात असत. मात्र , जुलै २०१३ पासून या डेअरीचे कामकाज हळूहळू ठप्प होऊन दूध संकलन बंद करण्यात आले. त्यानंतर २ वर्षे गोकुळ दूध संघाने त्यांच्याकडील दूध थंड करण्यासाठी या डेअरीचा वापर केला. मात्र , त्यानंतर त्यांनी स्वतःचे कोल्ड स्टोरेज उभारल्यानंतर तेही बंद झाले . तर सन २०१५ पासून या डेअरीचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. या शासकीय डेअरीत आता केवळ एक वरिष्ठ लिपिक , दोन पहारेकरी असे अवघे तीनच कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे या शासकीय दूध डेअरीचा मोठा डोलारा लवकरच कोसळण्याची शक्यता आहे.
मंत्र्यांचे आश्वासन हवेतच विरले !
२०१७ मध्ये दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी या शासकीय डेअरीला भेट दिली होती. त्यावेळी या डेअरीच्या नुतनीकरणाचा ४० लाखाचा प्रस्ताव त्यांच्याकडे देण्यात आला होता. २० कर्मचार्यांची नियुक्ती आणि डेअरीचे नुतनीकरण केल्यास ही डेअरी पुन्हा एकदा कार्यान्वित करणे शक्य आहे.असेही त्यांच्या निदर्शनास आणण्यात आले होते. मात्र, मंत्र्यांनी डेअरी पुनरूज्जीवनाचे त्यावेळी दिलेले आश्वासन हवेतच विरले आहे. तर या डेअरीची शोकांतिका समोर येत असतानाही सिंधुदुर्गातील एकाही लोकप्रतिनिधीने या डेअरीकडे गेली अनेक वर्षे ढुंकूनही पाहिलेले नाही. हे सिंधुदुर्ग वासीयांचे फार मोठे दुर्दैव आहे.