(आडाळी दोडामार्ग) सिंधुदुर्ग : घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग या सेवाभावी संस्थेने प्रजासत्ताकदिनी आयोजिलेल्या आडाळी जिवनदायी ओढा पुनरुज्जीवन उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळाला आणि सुमारे शंभर जणांच्या दिवसभराच्या परिश्रमानंतर गेली वीसपंचवीस वर्षे झाडझाडोरा, गाळ, कचरा, मातीने घुसमटलेला ओढ्याचा श्वास मोकळा झाला. पानवळ-बांदा महाविद्यालयाचे विद्यार्थी, ग्रामस्थ यांनी ही किमया करुन दाखवली.दोडामार्ग तालुक्यातील आडाळी येथील घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग या सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत व उपाध्यक्ष डॉ. सई लळीत यांनी या उपक्रमाची संकल्पना मांडली. आडाळी येथील ग्लोब ट्रस्टचे अध्यक्ष पराग गावकर, सर्वोन्नत्ती प्रतिष्ठानचे सचिव प्रविण गावकर यांनी ती उचलून धरली.
पानवळ (बांदा) येथील गोगटे-वाळके महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे ५० स्वयंसेवक यात उत्साहाने सहभागी झाले. आडाळी गावातील युवकांनीही चांगला प्रतिसाद दिला आणि या सर्वांच्या प्रयत्नातून दिवसभरात ओढ्याचे रुपच पालटून गेले. प्रवाह बंद पडलेला हा ओढा सायंकाळी खळाळून वाहू लागला. गावातील बागायती, पाणीपातळी राखण्यामध्ये आतापर्यंत महत्वाची भूमिका बजावली आहे.सकाळी नऊ वाजता सर्वजण गावातील माऊली मंदिरात एकत्र झाले. सतीश लळीत यांनी सर्वांना जलसंवर्धनाचे महत्व सांगून उपक्रमाचा उद्देश विशद केला. गोगटे-वाळके महाविद्यालयाचे एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. के. के. म्हेत्रे, पराग गावकर यांनी आवश्यक सुचना दिल्या आणि साडेनऊच्या सुमारास सर्व पथकाने श्रमदानाला सुरुवात केली.
सुमारे दीड किलोमीटर लांबीच्या या ओढ्यातील वाढलेली झाडी, तसेच पात्रातील लाकडे, कचरा आधी साफ करण्यात आला. नंतर फावडे व घमेल्यांच्या सहाय्याने गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात झाली.ओढ्यातील ज्या भागातील काम मानवी शक्तीच्या पलिकडील होते, त्याठिकाणी जेसीबी यंत्राची मदत घेण्यात आली. सायंकाळी ओढ्यावर वनराई बंधारा घालण्यात आला. गेली कित्येक वर्षे या ओढ्याकडे पूर्ण दुर्लक्ष झाल्याने गाळ व कचऱ्याने भरलेले ओढ्याचे पात्र व झरे मोकळे झाल्याने ओढ्याचे पात्र सफाईनंतर पाण्याने भरुन गेले.
सायंकाळी काम संपल्यानंतर सर्वजण घुंगुरकाठी भवनमध्ये एकत्र जमले. यावेळी घुंगुरकाठी, ग्लोब ट्रस्ट यांच्यावतीने जेसीबी चालक अनिल राठोड यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
पात्रात अडकलेली मोठमोठी झाडे यादव यांनी कौशल्याने बाहेर काढली. सहभागी एनएसएस विद्यार्थ्यांचा प्रतिकात्मक सत्कार प्रा. म्हेत्रे यांना शाल देऊन करण्यात आला. राष्ट्रगीताने उपक्रमाची सांगता करण्यात आली. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी मधुकर गावकर, संदीप गावकर यांनी परिश्रम घेतले.