सावंतवाडी : फसवणुकीच्या गुन्ह्यात सहकार्य करण्यासाठी दोघा पोलिस अधिकाऱ्यांनी दिड लाखाची लाच मागितली होती. त्यातील एक लाख रूपयांची रक्कम घेताना सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर खंडागळे याला रंगेहाथ पकडले होते. तर दुसरा संशयित पोलिस उपनिरीक्षक सुरज पाटील हा मंत्री दीपक केसरकर याच्या बंदोबस्तात होता. त्याला रात्री उशिरा बांदा पोलिसांचे पथक ताब्यात घेण्यासाठी गेले खरे, पण तत्पूर्वीच तो उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्याचे कारण देत येथील कुटीर रूग्णालयात दाखल झाला आहे.
सिद्धांत परब यांच्याकडून लाच स्वीकारल्या प्रकरणी रायगड लाच लुचपत विभागाच्या पथकाने सावंतवाडीचा एपीआय सागर खंडागळे याला ताब्यात घेतल्यानंतर व्हीआयपी दौऱ्यात असलेल्या पीएसआय सुरज पाटील यांच्या मागावर संबंधित पथक आहे. या प्रकरणी पाटील यालाही ताब्यात घेण्यात येणार आहे, अशी माहिती रायगड लाच लुचपतचे पोलीस निरीक्षक रंजित गलांडे यांनी दिली आहे.
मंत्री दीपक केसरकर हे एक दिवसांच्या सिंधुदुर्ग जिल्हा दौर्यावर होते. त्यांच्या संरक्षणार्थ पोलिस उपनिरीक्षक सुरज पाटील असल्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची डोकेदुखी वाढली. तरीही पाटीलचा ताबा घेण्यासाठी बांदा पोलिसांचे एक पथक गोव्यात दाखल झाले असून त्यांनी सुरज पाटील याला ताब्यात घेतले व रात्री 12.30 वाचण्याच्या सुमारास सावंतवाडीत दाखल झाले.
मात्र, सावंतवाडीत पोचण्यापूवीच सुरज पाटील याची प्रकृती बिघडली असून त्याला येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत ची माहिती स्थानिक पोलीस ठाणे ला मिळाल्यानंतर तेथे दाखल झालेले स्थानिक गुन्हा अन्वेषण चे अधिकारी व पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरूण पवार हे पाटील च्या प्रकृतीची चौकशी करण्या साठी रूग्णालयात दाखल झाले आहेत.
मात्र लाच लुचपतचे अधिकारी संशयित सागर खंडागळे याची कसून चैकशी करीत आहेत.