रत्नागिरी : ५० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत विभागाने अटक केलेल्या आरोग्यसेविका बेबीनंदा खामकर आणि आशालता भागवत यांच्यावर सोमवारी जिल्हा परिषदेकडून निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे.नोकर भरतीच्या यादीमध्ये नाव आणण्यासाठी खामकर आणि भागवत यांनी ६ लाख रुपयांची मागणी केली होती. त्यांच्या मागणीनंतर त्या दोघींनी ५ लाख ५० हजार रुपयांचे धनादेश घेतले होते. त्यानंतर या दोघींनी त्यांच्याकडून ठरल्याप्रमाणे रक्कम धनादेशाद्वारे वसूल केली होती. उर्वरित रक्कम वसूल करण्यासाठी त्या दोघींनी तक्रारदारकडे तगादा लावला होता. शनिवारी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास भागवत हिचा पती दिलीप यादव याला तक्रारदारकडून ५० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. त्यानंतर त्या दोघींनाही अटक करण्यात आली. या प्रकरणामध्ये दोघी अडकल्याने जिल्हा परिषद प्रशासनाकडून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याच्या हालचाली शनिवारी सायंकाळपासून सुरु करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सोमवारी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होणार असल्याचे निश्चित आहे.या लाचखोर आरोग्यसेविकांचे परिषद भवनात वेगवेगळे किस्से ऐकावयास मिळत आहेत. भागवत हिने अनेकांकडून बदलीसाठी यापूर्वी पैसे उकळले आहेत. त्यामुळे मध्यंतरी अनेकांनी तिच्याकडे पैशांसाठी तगादाही लावला होता. आजारी असल्याने तिला मुख्यालयी प्रतिनियुक्तीवर ठेवण्यात आले होते. मात्र, याचा गैरफायदा घेऊन वरिष्ठांच्या नावे बदल्या करणे, भरतीच्या वेळी सावज पकडून यादीमध्ये नाव येण्यासाठी लाखो रुपये वसूल करण्याचा तिचा व्यवसायच बनल्याची चर्चा सुरु आहे.लाचखोर खामकर हिनेही बदल्या, भरतीमध्ये वरिष्ठांच्या नावे बक्कळ पैसा कमावल्याचे बोलले जात आहे. तीन वर्षांपूर्वी तिची अन्य तालुक्यामध्ये बदलीही झाली होती. मात्र, तिने राजकारण्यांना हाताशी धरुन बदलीही रद्द करुन घेतली होती. (शहर वार्ताहर)
लाचखोर खामकर, भागवतांचे होणार निलंबन
By admin | Published: April 02, 2017 11:50 PM