मालवण, आचरा : गेले तीन दिवस देवाच्या आज्ञेने वेशीबाहेर असलेला वायंगणी गाव चौथ्या दिवशी कौलाने शेकडो ग्रामस्थांच्या साक्षीने गजबजला. सोमवारपासून सुरु झालेल्या पूर्वापार देवपळणीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गावाच्या वेशीबाहेर निसर्गाच्या सान्निध्यात संसार थाटलेल्या ग्रामस्थांना गुरुवारी देवाचा गावात परतण्याचा कौल मिळाला. श्री देव रवळनाथासमवेत सवाद्य ढोल ताशाच्या गजरात ग्रामस्थांनी उत्साहात गावात प्रवेश केला. जणू तीन दिवसांच्या विश्रांती नंतर नवा जोश प्राप्त झाल्याचे ‘वायंगणकरां’च्या चेहऱ्यावर जाणवत होते. तालुक्यातील वायंगणी गावचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथाची दर तीन वर्षांनी होणारी देवपळणीची सांगता गुरुवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास झाली. सोमवार १४ मार्च पासून सुरु झालेली तीन दिवस-तीन रात्रीची देवपळण बुधवार १६ मार्च रोजी रात्री संपली. त्यानंतर आज गुरुवारी सकाळच्या सत्रात देव रवळनाथाला गावात परतण्याचा कौल लावण्यात आला. धार्मिक विधी संपन्न झाल्यावर देवाने ३ वाजता गावात प्रवेश करण्याची आज्ञा केली. देवपळणीत सहभागी झालेल्या अबाल वृद्धांच्या चेहऱ्यावर प्रसन्नतेची चमक दिसून येत होती. आपल्या गावात जाण्यासाठी बच्चे कंपनीही सर्व साहित्य घेवून सज्ज झाली होती. वायंगणी गावात लोक श्रद्धेच्या प्रतिक असलेल्या रूढी-परंपरात खंड पडू देत नाही. गावकरी मंडळी गुण्यागोविंदाने नांदावेत, हा उद्दात हेतू देवपळणी मागे आहे. यामागे कोणतीही अंधश्रद्धा नसून प्रत्येक गावकऱ्याला स्फूर्ती देणारा तो क्षण असतो, असे गावकऱ्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले. (प्रतिनिधी)रवळनाथाचा गावात परतण्याचा कौल...अन् वायंगणी गजबजलीगावात देवासमवेत परतण्याची आज्ञा ग्रामस्थांना मिळताच सर्वांनी आपले सामान, साहित्य एकत्र केले. दरम्यान धार्मिक विधी नंतर गावातीन सर्व मंदिरांचे मानकरी गावात गेले. देवपळणीच्या निमित्ताने गावातील सर्व मंदिरे बंद असल्याने प्रमुख मानकऱ्यांनी सर्वप्रथम गावात प्रवेश करून मंदिराचे दरवाजे उघडत सर्व साफसफाई करून पुन्हा चिंदर गोसावीवाडी येथे ते मानकरी आले. त्यानंतर दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास देवासहित ग्रामस्थांनी गावात प्रवेश केला. तीन दिवस थांबलेली वायंगणी पुन्हा एकदा गजबजून गेली.वायंगणी गावाचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथाने तीन दिवसासाठी गावच्या वेशीबाहेर वास्तव्य केले.गुरुवारी सकाळी चिंदर गोसावीवाडी येथील घुमटीत देवाच्या श्रीफळाचे धार्मिक पूजन करण्यात आले. त्यांनतर देवाने गावात परतण्याचा कौल दिला. त्यानंतर मानकरी, जाणकार तसेच ग्रामस्थांच्या उपस्थितीत छोटेखानी बैठक घेण्यात आली. देवाचा प्रसाद दिल्यावर गावात देवासमवेत तीन वाजता गावात जाण्याचे सांगण्यात आले.
‘वायंगणीकरां’च्या चेहऱ्यावर प्रसन्नतेची चमक
By admin | Published: March 17, 2016 11:07 PM