कणकवली : कुडाळ येथे सिंधु सरस प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून, जिल्हा परिषद अध्यक्ष तसेच जिल्हा परिषद सदस्यांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी विश्वासात घेतले नाही. त्यांचा मनमानी कारभार सुरू असून जिल्ह्यातील पाणीटंचाई आराखड्यातील कामेही आपल्या मनाप्रमाणे ते काटछाट करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या या कृतीचा काँग्रेस जिल्हा परिषद सदस्य निषेध करीत असून, त्यांच्यावर अविश्वास ठराव आणणार असल्याची माहिती जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई, तसेच जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतीश सावंत यांनी संयुक्तरीत्या घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.येथील काँग्रेस संपर्क कार्यालयात रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्या संजना सावंत, श्रीया सावंत, सायली सावंत, राजलक्ष्मी डिचोलकर उपस्थित होत्या. यावेळी रणजित देसाई म्हणाले, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्यावतीने कुडाळ येथे सिंधु सरस प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. २६ ते २९ मार्च या कालावधीत हे प्रदर्शन होत असून, २७ मार्चला उद्घाटन होणार आहे. मात्र, या प्रदर्शनाचे काहीच नियोजन नसल्याने रविवारी सायंकाळपर्यंत मंडपाचे कामही पूर्ण झाले नव्हते. २८ मार्चला गुढीपाडवा आहे. या सणाच्या दिवसी या प्रदर्शनास कोणीही येणार नाही. मात्र, ३१ मार्च पूर्वी फक्त निधी खर्च घालण्यासाठी प्रदर्शनाचा सोपस्कार पूर्ण केला जात आहे.हे प्रदर्शन डिसेंबर महिन्यात घेण्यात यावे, असा ठराव जिल्हा परिषदेच्या सभागृहात घेण्यात आला आहे. या महिन्यात जिल्ह्यात पर्यटक येत असतात. त्यामुळे या प्रदर्शनात मालाची चांगली विक्री होऊ शकते; पण अशी मागणी आम्ही करूनही ती डावलण्यात आली आहे. याला मुख्य कार्यकारी अधिकारी जबाबदार आहेत.निमंत्रण पत्रिकेतही प्रोटोकॉल डावलण्यात आला आहे. तर केवळ पालकमंत्र्यांच्या वेळेचा फक्त विचार करण्यात आला असून, निधी खर्ची घालण्यासाठी हे प्रदर्शन आयोजित केले आहे. सध्या दहावीची परीक्षा सुरू असून, कुडाळ हायस्कूलपासून १00 मीटरच्या अंतरात हे प्रदर्शन होत असल्याने उद्घाटनाची भाषणे तसेच इतर कार्यक्रमांचा आवाज विद्यार्थ्यांना सहन करीत परीक्षा द्यावी लागणार आहे. हे दुर्दैवी आहे.जिल्हा परिषदेतील विषय समित्यांचे नवीन सभापती निवडीपर्यंत जिल्हा परिषद अध्यक्ष त्यांचे काम पाहत असतो; परंतु मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अध्यक्षांना विश्वासात न घेता विषय समित्यांच्या सभापतींच्या स्वीय सहायकांना त्यांच्या विभागात परत पाठविले आहे. हाही मनमानीचाच भाग आहे. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या वागणुकीबद्दल कोकण आयुक्तांकडे येत्या चार दिवसांत तक्रार करण्यात येणार आहे.यापूवीर्ही आॅगस्ट २0१६ च्या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर अविश्वास ठराव आणण्याचे आम्ही निश्चित केले होते. मात्र, त्यावेळी आमचे नेते नारायण राणे यांनी ‘त्यांना कारभारात सुधारणा करण्याची संधी देऊया, अविश्वास ठराव आणू नका’ असे सांगितले होते. त्यामुळे आम्ही थांबलो होतो; परंतु त्यांच्या वर्तणुुकीत सुधारणा झालेली नाही. त्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागत आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)आचारसंहितेचा फक्त बाऊ !मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून फक्त आचारसंहितेचा बाऊ केला जात आहे. नवीन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांची निवड झाली असूनही अजूनपर्यंत त्यांच्याबरोबर अर्थसंकल्पाबाबत चर्चाही करण्यात आलेली नाही. पाणीटंचाई आराखड्यातल्या कामांना ते परस्पर कात्री लावत आहेत. त्यांच्याकडून लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले जात नाही. तर कच्चे बंधारे बांधण्याचे योग्य नियोजन न केल्याने ५0 टक्के बंधारे बांधून झालेले नाहीत. त्यामुळे पाण्याअभावी नागरिकांचे हाल होणार आहेत. हा हलगर्जीपणा आहे, असे यावेळी सतीश सावंत म्हणाले.
सीईओंविरोधात ‘अविश्वास’ आणणार
By admin | Published: March 26, 2017 10:44 PM