सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन आराखड्यातील मंजूर १०० कोटी निधीपैकी आतापर्यंत ६२ कोटी ३६ लाख निधी प्राप्त झाला असून, मार्चअखेर १०० टक्के निधी खर्चाचे नियोजन करण्यात आले आहे. तर सन २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठी ७० कोटी ३३ लाख निधी बजेटचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मात्र, जिल्ह्याचे वार्षिक बजेट ११० कोटींपर्यंत वाढवून घेऊ, अशी ग्वाही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिली.जिल्हा नियोजन समितीची सभा पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झाली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, राज्यसभा सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर, आमदार वैभव नाईक, नीतेश राणे, जिल्हाधिकारी ई. रवींद्रन, जिल्हा नियोजन अधिकारी हरीबा थोरात, आदींसह अधिकारी, खातेप्रमुख, समिती सदस्य उपस्थित होते. जिल्हा नियोजन समितीची सभा राजकीय बदलानंतर प्रथमच सोमवारी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेच्या सुरूवातीलाच काँग्रेस आमदार नीतेश राणे यांच्यासह सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली. स्थायी समितीचा आरोंदा जेटी पाहणी दौरा व त्यावेळी झालेली पोलीस कारवाई, नियोजन आराखड्यातील जुनी कामे कायम ठेवण्याची मागणी तसेच काही कामे यादीतून वगळल्याचा आरोप करीत सभागृहात हंगामा केला. विरोधी सदस्यांना शांत करीत जिल्हा नियोजनची पहिलीच सभा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी त्यांचे राजकीय कसब दाखवत शांतपणे हाताळली. तुमचे अधिकार तुम्हाला मिळतील, पण त्याचा अतिरेक नको. पालकमंत्री म्हणून मलाही अधिकार आहेत, पण ते मला वापरायला लावू नका, असेही यावेळी आक्रमक सदस्यांना सुनावले. (पान ८ वर) या विभागांचा ५0 टक्के पेक्षा कमी झाला खर्चजिल्हा दुग्धविकास, कृषी अधीक्षक कार्यालय, सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय, लघुपाटबंधारे कार्यकारी अभियंता, पत्तन अभियंता, सार्वजनिक बांधकाम सावंतवाडी, जिल्हा व्यवसाय शिक्षण-प्रशिक्षण, जिल्हा समाजकल्याण, शिक्षण विभाग, समाजकल्याण विभागांचा खर्च निम्म्याहून कमी झाला.सभेचा शेवट गोडसभेच्या सुरूवातीला वातावरण तापले होते. काही मुद्यांवर सत्ताधारी- विरोधी सदस्यांमध्ये हमरीतुमरी झाली. तरीही आपल्या खास शैलीत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सर्वांना शांत करीत प्रेमाने जग जिंकता येते, असा गोड सल्ला दिला.११ कोटी १७ लाख समर्पितखर्च न होणारे ११ कोटी १७ लाख रूपये अन्य विभागांना सोमवारच्या सभेत वर्ग करण्यात आले. यात गाभा क्षेत्रात ८ कोटी ४ लाख तर बिगर गाभा क्षेत्रात ३ कोटी १३ लाख असे वाढवून दिले आहे.चालू आर्थिक वर्षाचा निधी शंभर टक्के खर्च करून पुढील वर्षासाठी ११० कोटीपर्यंत निधी प्राप्त करून घेऊ, अशी ग्वाही यावेळी पालकमंत्री केसरकर यांनी सभेत दिली.सन २०१५-१६चे तीन स्वतंत्र प्रारूप आराखडे तयार करण्यात आले असून ७० कोटी, १०० कोटी व १२५ कोटी असे तीन प्रकल्प आराखडे तयार करून शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत. जिल्ह्णाचा विकास सर्वांना विश्वासात घेऊन करायचा आहे. ज्या विभागाच्या तक्रारी आहेत, समस्या आहेत, अशा विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या खास सभा घेऊन तसेच सर्व आमदार, खासदार, समिती सदस्यांना एकत्रित घेऊन सभांचे नियोजन केले जाईल. तेथे सविस्तर चर्चा करून समस्या सोडविल्या जातील, असे केसरकर यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
जिल्ह्याचे बजेट ११0 कोटींपर्यंत नेऊ
By admin | Published: February 02, 2015 10:59 PM