महेश सरनाईक
सिंधुदुर्ग : नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात कोकण विकासासाठी जवळपास साडेतेरा हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील मत्स्यव्यवसाय वाढीस अधिक चालना मिळणार आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्याला १२१ किलो मीटरचा सागरी किनारा लाभला आहे. यावरील ८७ गावांमधून मासेमारी चालते. २०१६ नुसार ३२ हजार १७ ही मच्छीमारांची लोकसंख्या आहे. एकूण ७ हजार ३०४ कुटुंबे असून त्यापैकी ७ हजार १७४ क्रियाशील मच्छीमार आहेत. जिल्ह्यात मासळी उतरविण्याची ३४ केंद्रे आहेत. तर शासकीय मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र दांडी मालवण येथे आहे. एकूण २३ बर्फ कारखाने असून ३ शीतगृहे आहेत. एकूण परवानाधारक मासेमारी नौका २ हजार ८२६ आहेत. १ हजार ६४६ परवानाधारक यांत्रिक नौका आहेत. तर परवानाधारक बीगर परवानाधारक नौका १ हजार १८० इतक्या आहेत. २३ सागरी मत्स्य सहकारी संस्था असून २६ हजार ७७२ मत्स्य सहकारी संस्थांचे सभासद आहेत. ३८० डिस्ट्रेस अलर्ट ट्रान्समिशन यंत्र असून २१ व्हिटीएस-एआयएस यंत्र आहेत. ३१२ नौकाधारकांना किसान क्रेडीट कार्ड देण्यात आले आहे. निमखारे पाणी खाजणक्षेत्र २ हजार २१६ हेक्टर असून संवर्धनास उपयुक्त क्षेत्र १ हजार २६८ हेक्टर इतके आहे. तटीय जलकृषी प्राधिकरण अंतर्गत ५५ नोंदणीकृत तलाव आहेत. त्यापैकी २८ सुरु आहेत. मासेमारी हक्क असणारे पाटबंधारे तलाव २८ आहेत. ठेक्याने देण्यात आलेले तलाव २५ आहेत. गोड्या पाण्यातील मत्स्य सहकारी संस्था ६ आहेत. २०२९-२० साली मत्स्य उत्पादन १७ हजार ३१२ मेट्रीक टन इतके झाले आहे. कोकणातील नारळ, सुपारी, मिरी,काजू, फणस,आंबा या फळपिकांबरोबरच प्रक्रीया उद्योगाला चालना मिळणार आहेच शिवाय मत्स्यव्यवसाय वृध्दीसाठी मोठा फायदा मिळणार आहे.मोपा हे आंतरराष्ट्रीय आणि बॅ.नाथ पै अशा दोन विमानतळांमुळे पर्यटन जिल्ह्यातील पर्यटनवाढी बरोबरच येथील शेती-मत्स्य उत्पादनाची निर्यात होण्यासही भविष्यात मोठी संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे निश्चितच छोट्या-मोठ्या रोजगारांबरोबरच उद्योग-व्यवसायांची देखील वाढ होणार आहे. अर्थसंकल्पातील तरतुदीचा हा बुस्टर डोस जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला लाभदायक ठरणार आहे. राज्याचा अर्थसंकल्प राज्याच्या विकासाच्या दृष्टीकोनातून फायदेशीर आहेच, विशेषत: कोकणाच्या विकासाला गतीमान करणारा ठरणार आहे.