मालवण : तालुक्यातील बुधवळे-कुडोपी ग्रामपंचायतीच्यावतीने वाढत्या वीज बिलाच्या समस्येवर तसेच ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाचा विचार करून बुधवळे व कुडोपी या दोन अंगणवाड्यांमध्ये सौरऊर्जेचा यशस्वी उपक्रम पूर्णत्वास नेला आहे.बुधवळे ग्रामपंचायतीच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक करताना सरपंच तुषार पाटणकर, ग्रामसेवक के. आर. दळवी यांच्या नियोजनात्मक कामाचे हे यश आहे, असे पंचायत समिती सदस्य राजू परुळेकर यांनी सांगितले.सौरऊर्जेच्या उपक्रमामध्ये गटविकास अधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभल्याचे ग्रामसेवक दळवी यांनी सांगितले. ग्रामपंचायत हद्दीत दहा वषार्पूर्वी सौर पथदीप बसविण्यात आले होते.
या सौर पथदिपांचा दुरूस्तीचा खर्च व वाढत्या चोऱ्या याचा विचार करून ग्रामपंचायतीने बंद सौर पथदिपांच्या सौर पॅनलचा वापर करून या दोन्ही अंगणवाड्यांमधील वीजेचा प्रश्न सोडविला आहे. यामुळे वीजेचे बीलही शून्य रुपये आले आहे. जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये सौरऊर्जेचा वापर करण्याचा हा पहिलाच प्रयोग असल्याने संपूर्ण ग्रामपंचायतीच्या टीमचे कौतुक होत आहे.सोलर सिस्टिम उद्घाटन कार्यक्रमास उपसरपंच गायत्री परब, कृषी विस्तार अधिकारी बी. के. जाधव, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र हिर्लेकर, राजेंद्र मुणगेकर, उल्का पडवळ, सानिका बिर्जे, सुप्रिया मगम, उल्केश येरम, सूर्यवंशी, माजी सरपंच श्रीमती पांगे, उपसरपंच रवींद्र घाडी, संदीप बुधवळेकर, शेलार, पडवळ, चिंदरकर यांच्यासह अन्य ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.प्रभावी योजना राबविण्यात अग्रेसरतालुक्यातील अती दुर्गम भागात ही ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायतीने आयएसओ मानांकन, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात प्रथम, स्मार्ट ग्राम योजना, पेपरलेस ग्रामपंचायत असे विविध पुरस्कार मिळविले आहेत.
घरपट्टी वसुली शंभर टक्के, महिला बालकल्याण, दिव्यांग योजना, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, बायोगॅस आदी विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात ग्रामपंचायत अग्रेसर आहे.