सावंतवाडी : गतवर्षीच्या महापुरात दाभिल रस्ता वाहून गेला होता. त्यामुळे गावाशी इतरांचा असलेला संपर्कच तुटला होता. या रस्त्याची खासदार विनायक राऊत यांनी अधिकाऱ्यांसह पाहणी केली. तसेच रस्त्याचे काम तत्काळ पूर्ण करा, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी ग्रामस्थांनी दाभिल नदीचे पात्र वाढविले पाहिजे तसेच पुन्हा डोंगर खचू नये यासाठी नदीपात्रालगत संरक्षक भिंत बांधण्यात यावी, अशा मागण्या केल्या.खासदार विनायक राऊत यांनी दाभिल गावाला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत तहसीलदार राजाराम म्हात्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, माजी सभापती अशोक दळवी, विधानसभा संपर्कप्रमुख विक्रांत सावंत, माजी उपसभापती चंद्रकांत कासार, अपर्णा कोठावळे, शब्बीर मणियार, प्रशांत कोठावळे, ठेकेदार बी. डी. पाटील आदी उपस्थित होते.गतवर्षीच्या महापुरात दाभिल गावाला जोडणारा रस्ता नदीत वाहून गेला होता. त्यामुळे गावाशी होणारा संपर्क पूर्णपणे तुटला होता. बांधकाम विभागाने त्यावेळी तात्पुरती डागडुजी केली होती. त्यानंतर या रस्त्याचे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून काम हाती घेण्यात आले होते. याची पाहणी खासदार राऊत यांनी केली.
यावेळी ग्रामस्थ आबा घाडी यांच्यासह अनेकांनी नदीवरच्या बाजूला संरक्षक भिंत बांधण्यात यावी तसेच नदीतील दगड काढून पात्र रिकामे करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. वाढीव कामाबाबत आपण स्वत: जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेणार असल्याचे राऊत यांनी सांगितले तसेच कामाची माहिती घेतली. तसेच पावसात पुन्हा डोंगर खचला जाऊ नये म्हणून संरक्षक भिंत घाला. त्याचा प्रस्ताव द्या. तसेच मी स्वत: पाटबंधारे विभागाशी चर्चा करीन, असेही खासदार राऊत यांनी यावेळी सांगितले.