सावंतवाडी : पोलीस ठाण्याची शहरातील जीर्ण इमारत पाडण्यासाठी कार्यकारी अभियंता सुरेश बच्चे यांनी नवीन फंडा काढला आहे. इमारत पाडण्यासाठी लागणारा निधी सरकारकडून न घेता सामानाचा लिलाव काढून स्वत:चे पैसे घ्या आणि उरलेले सरकार जमा करा, असा आदेश काढल्याने ठेकेदाराचे धाबे दणाणले असून, अधिकाऱ्यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे सरकारचाही फायदा होणार आहे.सावंतवाडी बांधकाम विभाग म्हणजे ठेकेदारांना आंदण दिल्याचा प्रकार होता. मात्र, नवनियुक्त कार्यकारी अभियंता सुरेश बच्चे यांनी या सर्व प्रकाराला लगाम घालण्याचे काम सुरू केले आहे. अनेक दिवसांची मागणी असलेली जुनी पोलीस ठाण्याची इमारत निर्लेखित करत ती नव्याने बांधण्याच्या कामाला लवकरच सुरूवात करण्यात येणार आहे. मात्र, त्यापूर्वी जुनी इमारत पाडण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी निविदा काढण्यात येणार होती. पण अधिकाऱ्यांच्या लक्षात आले की, ही इमारत जर पाडली तर त्यात एवढे लाकडी सामान तसेच अन्य वस्तू आहेत की त्यांचा लिलाव केल्यास यातून मोठ्या प्रमाणात पैसा सरकारला मिळणार आहे. त्यामुळे ठेकेदाराने इमारत पाडून लिलाव करायचा आणि उरलेला पैसा सरकारला जमा करायचा असा नवा फंडा शोधून काढला आहे.त्यामुळे सावंतवाडी बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांबरोबरच ठेकेदारांचे धाबे दणाणले असून, अधिकारीही कामाला लागले आहेत. कार्यकारी अभियंता बच्चे यांनी सावंतवाडीचा पदभार स्वीकारल्यापासून छोट्या छोट्या गोष्टी स्वत:च्या देखरेखीखाली आणत त्यावर उपाययोजना आखल्या आहेत. आंबोली घाटात गेल्यावर्षी केलेल्या रस्त्याला खड्डे पडताच हा रस्ता त्याच ठेकेदारकडून पुन्हा करून घ्या, असे फर्मान सोडत बच्चे यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवली आहे. आणि आता सावंतवाडी पोलीस ठाण्याची इमारत ठेकेदाराने स्वत:च्या पैशातून पाडावी असे आदेश काढल्याने बांधकाम विभागाच्या पायऱ्या झिजवणाऱ्या ठेकेदारांची चांगलीच कोंडी झाली आहे. (प्रतिनिधी)यापुढे प्रत्येक कामावर आपले लक्ष राहणार असून, कामाचा दर्जा योग्य कसा राखला जाईल याची काळजी मी घेणार आहे. प्रत्येक रस्ता जास्तीतजास्त काळ टिकेल याची काळजी मी घेण्यापेक्षा प्रत्येक ठेकेदारानेच घेतली पाहिजे.तरच रस्त्यांचा विकास होणे शक्य होईल.- सुरेश बच्चे, कार्यकारी अभियंता
इमारत पाडा; लिलावातून स्वत:चा खर्च घ्या!
By admin | Published: October 15, 2015 11:28 PM