दापोली : तालुक्यातील संगणकीकृत झालेल्या कुडावळे ग्रामपंचायतीवर, हक्काची इमारत असताना ती सोडून भाड्याच्या जागेत कार्यालय थाटण्याची वेळ आली आहे. कार्यालयाची इमारत मोडकळीस आल्याने तिच्यावरील छप्पर उतरविण्यात आले आहे. या इमारतीच्या दुुरुस्तीचा प्रस्ताव चार वर्षांपूर्वी पाठवूनही निधी नसल्याचे कारण सांगत तो अडकून पडल्याने कुडावळे ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांवर ही वेळ आली आहे. कुडावळे येथील ग्रामपंचायत इमारत मोडकळीस आली आहे. छप्पराचे वासे पूर्णपणे कमकुवत झाले असून, कौलेही फुटली आहेत. ही इमारत कार्यालय भरवण्यास धोकादायक असल्याने याबाबतचा प्रस्ताव ग्रामपंचायतीतर्फे दोन वर्षांपूर्वीच जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आला होता. मात्र गेली चार वर्षे निधी नसल्याचे कारण सांगत, जिल्हा परिषदेकडून इमारत पुर्नबांधणी व दुरुस्तीवर एकही रुपया खर्च झालेला नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीची मूळ इमारत सोडण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर आली आहे.आठ ते दहा दिवसांपूर्वी ग्रामपंचायतीच्या या इमारतीवरील छप्पर काढण्यात आले व ही इमारत खाली करण्यात आली. त्यानंतर गावातीलच एका भाड्याच्या जागेत ग्रामपंचायतीचे कार्यालय भरत आहे. विशेष म्हणजे या ग्रामपंचायतीत संगणकही आहेत. संगण0कीय युगात ग्रामपंचायतीचा कारभार हलता रहावा, यासाठी सरकारने संगणक पुरविले. मात्र गेली चार वर्षे या इमारतीची दुरुस्ती करण्याची शासनाला बुद्धीच झाली नाही. या इमारत बांधण्याच्या कामाला अंदाजपत्रकीय तांत्रिक मंजुरी ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून २४ नोव्हेंबर २०११ मध्ये देण्यात आली आहे. मात्र अद्यापपर्यंत त्याचे अनुदान उपलब्ध झालेले नाही.विशेष म्हणजे संगणकीकृत ग्रामपंचायत योजनेत प्राधान्य देणाऱ्या शासनाने या ग्रामपंचायतीच्या इमारतीकडे मात्र लक्षच पुरवले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. इमारत बांधण्यासाठी जनसुविधा योजना शासनाने सुरु केली आहे. वार्षिक योजनेंतर्गत जनसुविधा या योजनेतून इमारतीला निधी मिळू शकतो. मात्र तो प्राप्त न झाल्याने कर्मचारी आणि ग्रामस्थांकडून संताप व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
इमारत आली मोडकळीस
By admin | Published: January 15, 2015 10:00 PM