कुडाळ (सिंधुदुर्ग) : कुडाळ तालुक्यातील पाणी पातळी वाढण्यासाठी कुडाळ पंचायत समितीने शुक्रवारी तालुक्यात बंधारा दिवस जाहीर करीत शासकीय निधीचा वापर न करता केवळ लोकसहभाग व श्रमदानातुन संपुर्ण तालुक्यामध्ये शुक्रवारी एकाच दिवशी ३६९ बंधारे बांधले असुन अशा प्रकारे एकाच दिवशी बंधारे बांधण्याचा उपक्रम राबविणारी कुडाळ पंचायत समिती ही राज्यातील एकमेव पंचायत समिती ठरणार आहे. येत्या काही दिवसात हजार बंधारे बांधण्याचा सकंल्प या समितीच्या वतीने करण्यात आला आहे.
राज्यातील काही जिल्ह्यात पाण्याची तीव्र टंचाई असते तर या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडुन ही या ठिकाणच्या अनेक गावाला पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. त्यामुंळे जमिनीतील पाणी पातळी वाढवुन पाणी टंचाई टाळण्यासाठी शासनाच्या वतीने वनराई बंधारे मोहीम दरवर्षी राबविली जाते.
या वर्षी ही कुडाळ तालुक्यात कुडाळ पंचायत समितीच्या वतीने बांधण्यात येणार्या १ हजार वनराई बंधारे बांधण्यात येणार असुन पंचायत समितीच्या वतीने शुक्रवार दि. १७ नोव्हेंबर हा दिवस बंधारा दिवस साजरा करून या दिवशी २०० बंधारे बांधण्याचा उपक्रम हाती घेतला होता.
या वनराई बंधाऱ्याच्या बांधकामाचा शुभारंभ वेताळ बांबर्डे कदमवाडी येथे जिल्हापरिषद उपाध्यक्ष रणजित देसाई यांच्या हस्ते झाला. यावेळी कुडाळ पंचायत समितीचे सभापती राजन जाधव, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, सहाय्यक गटविकास अधिकारी मोहन भोई, पं. स. सदस्य नुतन आईर, वेताळ बांबर्डे नवनिर्वाचित सरपंच संध्या मेस्त्री, प्रभारी सरपंच दिलीप तिवरेकर, कृषी अधिकारी आर. जी. चोडणकर, प्रफुल्ल वालावलकर, बाळकृष्ण परब, नागेश आईर, ग्रामसेवक बी. डी. पिंटो, न्हानू शेळके, संतोष कदम, आंबेरकर, महादेव खरात, मंगेश जाधव, नितिन नानचे उपस्थित होते.
यावेळी रणजित देसाई यांनी सांगितले की, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो मात्र योग्य नियोजन नसल्याने काही गावात पाणी टंचाई होते. आता या जिल्ह्यात बंधारे बांधण्याचे योग्य नियोजन करून पाणी टंचाईवर मात करण्यात येणार आहे.
कुडाळ पंचायत समितीने या तालुक्यात हा बंधारे बांधण्याचा उपक्रम हाती घेतला आहे त्यामुंळे या तालुक्यातील पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढणार असुन निश्चितच या तालुक्यात पाणी टंचाई होणार नाही.
यावेळी राजन जाधव यांनी या बंधारे बांधण्याचा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी आम्ही योग्य नियोजन केले असुन या तालुक्यात हजार पेक्षाही जास्त बंधारे बांधुन भविष्यातील पाणी टंचाईवर मात करणार आहोत.ही आता लोकचळवळ - विजय चव्हाणकुडाळ तालुक्यात या पुर्वी वनराई व कच्चे बंधारे बांधण्यात येत होते. यावर्षी मात्र या तालुक्याच्या भौगोलिक व नैसर्गिक स्थितीनुसार काही गावामंध्ये विजय खरी बंधारे हे नविन बंधारे संकल्पना अंमलात आणुन जास्तीत जाल्त पाणी हे कसे अडविले जाईल या साठी प्रयत्न केला असुन बंधारे बांधणे ही आता लोकचळवळ झाली असल्याचे विजय चव्हाण यांनी सांगितले.
या तालुक्यात हा बंधारे बांधण्याचा उपक्रम यशस्वी होण्याकरीता तालुक्यातील ग्रामपंचायत, अंगणवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळा, सामाजिक - क्रिडा मंडळे, बचतगट, विविध संस्था, कर्मचारी संघटना व ग्रामस्थ यांनी सहभाग घेवुन श्रमदानातुन हे बंधारे बांधले आहेत.
एकाच दिवसात ३६९ बंधारे बांधलेकोणताही शासकीय निधी नसताना ही योग्य नियोजन, लोकसहभाग व श्रमदानातुन संपुर्ण तालुक्यामध्ये शुक्रवारी एकाच दिवशी वनराई बंधारे (१७३), कच्चे बंधारे (९८), विजय बंधारे (६७), खरी बंधारे (३१) असे मिळुन एकुण ३६९ बंधारे बांधले आहेत.