कणकवली: कणकवली शहरात 'थर्टी फर्स्ट' च्या मध्यरात्री संधी साधत तीन बंद घरे व एक दुकान अशा चार ठिकाणी अज्ञात चोरट्याने चोरीचा प्रयत्न केला. त्यामध्ये काही रोख रकमेसह मुद्देमाल चोरीस गेला असला तरी सोमवारी रात्री उशिरापर्यंत कणकवली पोलिस ठाण्यात याचोरीबाबत तक्रार दाखल झालेली नव्हती. त्यामुळे चोरीस गेलेल्या ऐवजाचा नेमका आकडा समजू शकलेला नाही. दरम्यान, चोरट्याने दोन ठिकाणी कोयते चोरले असल्याचे समजत असून एका शासकीय रास्त दराच्या धान्य दुकानातील १ हजार ३०० रुपयांची रोख रक्कम लांबवली आहे. चोरटा कोयता घेऊन रस्त्यावर फिरत असल्याचा एक व्हिडिओ कणकवली शहरात जोरदार व्हायरल होत आहे. या चोरीच्या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एक रास्त दराचे धान्य दुकान रविवारी मध्यरात्री २ .५४ वाजण्याच्या सुमारास चोरट्याने फोडल्याचे तेथील सीसीटीव्हीत कैद झाले आहे.तसेच जळकेवाडी येथील एका घरातील एक कोयता लंपास केला आहे. तसेच त्याच घराच्या ३ कपाटातील साहित्य विस्कटून टाकले होते. त्याचबरोबर त्या घरातील गाडी दुरुस्तीचे पाणे चोरीला गेले आहेत.बांधकरवाडी येथील एका घरात चोरीचा प्रयत्न झाला.तर मधलीवाडी येथील एका जुन्या घरातील कोयता आणि काही साहित्य चोरीला गेले. या चार ठिकाणी अज्ञात चोरट्याने चोरीचा प्रयत्न केला आहे. त्या चोरट्याने दरवाजाचा कडी कोयंडा तोडत, कपाटे उचकटून चोरीचा प्रयत्न केला .या चोरीच्या पार्श्वभूमीवर कणकवली पोलिसांनी एका चोरीच्या घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मात्र, ज्या घरात चोरी झाली,त्या घरमालकांनी कणकवली पोलिस ठाण्यात कोणतीही तक्रार दिलेली नसल्याने चोरीबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.
कणकवली शहरात चार ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न, चोरटा सीसीटीव्हीत कैद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2024 12:18 PM