आचरा : वायंगणी-तोंडवळी माळरानावर सोमवारी आढळून आलेल्या ‘त्या’ जळीत मृतदेहाची ओळख पटली आहे. प्रीतेश मधुकर ताम्हणकर (४०, रा. पुणे) असे त्या तरुणाचे नाव असून, त्याच्या हातातील अंगठीवरून त्याची पत्नी प्रीती ताम्हणकर यांनी ओळखल्याचे आचरा पोलिसांनी सांगितले. कर्जबाजारीपणा आणि आजारपणाला कंटाळून आत्महत्या करत असल्याच्या पत्रावरून प्रीतेश याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.तोंडवळी-वायंगणी सडा परिसरात शनिवारी सकाळी एका झाडाखाली अज्ञात व्यक्तीचा मृतदेह छिन्नविच्छिन्न आणि जळालेल्या अवस्थेत दिसून आला होता. मृतदेहापासून काही अंतरावर आधार कार्डचे लॅमिनेशन केलेला कागद पोलिसांना सापडून आला होता. त्यादृष्टीने पोलिसांनी तपास केला असता पुणे येथून ताम्हणकर नामक तरुण बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. वायंगणी सडा येथे मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळताच प्रीतेश याची पत्नी व नातेवाईक मालवणात दाखल झाले. मृतदेहाच्या हातात असलेल्या अंगठी तसेच अन्य वस्तूंच्या आधारे त्याच्या पत्नीने आपला पती असल्याचे पोलिसांना सांगितले.मृतदेहाची ओळख पटली असली तरी पोलिसांनी तपासाच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. मृतदेहाची ‘डीएनए’ चाचणी केली जाणार आहे. त्यामुळेच डीएनए अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृतदेह नेमका कोणाचा हे स्पष्ट होणार आहे. सोमवारी डीएनएसाठी मृतदेहाचे नमुने पाठविण्यात येणार असून, प्रीतेश याच्या सख्ख्या भावाचे रक्ताचे नमुने घेतले जाणार आहेत, असे आचरा पोलिसांकडून सांगण्यात आले.दरम्यान, पत्नीने आपला कोणावर संशय नसल्याचे आचरा पोलिसांना दिलेला जबाबात म्हटले आहे. याप्रकरणी अधिक तपास प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक तौसिफ सय्यद व सहायक पोलिस उपनिरीक्षक महेश देसाई हे करीत आहेत.१३ पासून नॉट रिचेबल; नातेवाइकांकडून शोधाशोधप्रीतेश हा पुणे येथे आयटी कंपनीत कामाला होता. तो हैदराबाद येथे प्रशिक्षणासाठी जातो, असे सांगून ८ जानेवारीला घरातून बाहेर पडला. त्यानंतर १३ जानेवारीपर्यंत पत्नीच्या संपर्कात होता. त्यानंतर त्याच्याशी पत्नीचा संपर्क होऊ न शकल्याने पुणे येथे १४ रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली. याचदरम्यान प्रीतेश याची सही असलेले पत्र १८ रोजी पत्नीच्या भावाला प्राप्त झाले.पत्रात आजारपण व कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटले होते. नातेवाइकांना पत्र प्राप्त होताच त्यांनी शोधाशोध सुरू केली. मात्र, त्यांचा माग कुठेच लागला नव्हता, असे पत्नीच्या जबाबात म्हटले आहे.
sindhudurg crime: वायंगणी-तोंडवळीतील 'तो' जळीत मृतदेह पुण्यातील तरुणाचा, 'अशी' पटली ओळख
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 6:37 PM