कणकवली : महाराष्ट्र शासनाने काही उद्योग सुरू करण्याची परवानगी देऊन संचारबंदी मध्ये काहीशी शिथिलता आणली आहे. त्यामुळे विविध साहित्य खरेदी करण्याच्या उद्देशाने सोमवारी कणकवली बाजारपेठेत नागरिकांनी पुन्हा एकदा गर्दी केली होती तर अनेक दुकानेही उघडण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करीत ही गर्दी पांगविली. तसेच जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर दुकाने बंद करायला लावली .दरम्यान, कणकवली तहसील कार्यालयात प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांच्या उपस्थितीत व्यापाऱ्यांची बैठक झाली. यावेळी तहसीलदार आर. जे. पवार , उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर, कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, नगराध्यक्ष समीर नलावडे, बंडू हर्णे, तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष विशाल कामत आदी उपस्थित होते.यावेळी प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी शासनाच्या सूचनांचे परिपत्रक व्यापाऱ्यांना दाखविले. तसेच त्याप्रमाणे कार्यवाही करण्याबाबत सूचना दिल्या. कणकवली तालुक्यातील फोंडाघाट तसेच अन्य बाजारपेठेतही ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. आठवडा बाजाराप्रमाणे सर्वत्र स्थिती दिसून येत होती.