आचरा :भरवस्तीत घुसून घराच्या समोरच बांधलेल्या गुरांमधील गाईच्या वासराला लक्ष्य करीत बिबट्याने शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास वासराचा फडशा पाडल्याची घटना घडली आहे. भक्ष्याच्या शोधात बिबट्या भरवस्तीत घुसल्याने त्रिंबक बागवेवाडीतील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी त्रिंबक गावात रविवारी सकाळी दाखल झाले.त्रिंबक बागवेवाडीतील हरी भाटकर यांच्या राहत्या घरासमोर रोजच्याप्रमाणे त्यांची गुरे बांधलेली होती. मध्यरात्री भरवस्तीत घुसलेल्या बिबट्याने भाटकर यांच्या घरासमोरच बांधलेल्या गुरांमधील गाईच्या वासराला लक्ष्य करीत दावणीला बांधलेल्या ठिकाणीच त्या वासराचा फडशा पाडला. पहाटे रोेजच्याप्रमाणे भाटकर हे उठून घराबाहेर आल्यानंतर सारा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. दावणीला बांधलेले गाईचे वासरू त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून आले.या घटनेची माहिती त्यांनी त्रिंबक पोलीस पाटील बाबू सकपाळ यांना दिली. सकपाळ यांनी वन विभागाला याची माहिती दिल्यानंतर काही वेळातच वन विभागाचे वनरक्षक विजय पांचाळ व वनमजूर अनिल परब हे घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी पाहणी करून पंचनामा केला.या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मालवण तालुक्याचे उपसभापती अशोक बागवे, पोलीस पाटील बाबू सकपाळ घटनास्थळी दाखल झाले होते. त्रिंबक बागवेवाडीत घुसलेला बिबट्या हा ओहोळाकडून भरवस्तीत घुसला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
बिबट्याच्या पंजाचे ठसेही ग्रामस्थांना वस्तीच्या दिशेने येत असल्याचे आढळून आले. पाण्यासाठी ओहोळाकडे आलेला बिबट्या भक्ष्यासाठी भरवस्तीत आल्याचा अंदाज ग्रामस्थांनी वर्तविला. बिबट्या वस्तीत घुसून त्याने दारात बांधलेल्या जनावरांची शिकार करणे ही गेल्या २५ वर्षांतील एकमेव घटना असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.अनुदानाची मागणीगाईच्या वासराचा बिबट्याने फडशा पाडल्याने शेतकरी कुटुंबातील भाटकर यांचे नुकसान झाले आहे. त्रिंबक बागवेवाडीत सुमारे ५० घरे आहेत. अशातच भक्ष्याच्या शोधात आलेला बिबट्या पुन्हा वस्तीत घुसण्याची शक्यता असल्याने त्रिंबक बागवेवाडीतील ग्रामस्थ भितीच्या छायेखाली आहेत. या घटनेनंतर येथील शेतकरी हे बंदिस्त गोठ्यांसाठी शासनाने जास्तीत जास्त अनुदान दयावे, अशी मागणी करीत आहेत.