रत्नागिरी : शिक्षण हक्क कायद्यानुसार शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये बदल करण्यात आला आहे. इयत्ता चौथी व सातवीच्या वर्गात घेण्या येणारी शिष्यवृत्ती परीक्षा आता पाचवी व आठवीच्या वर्गात घेण्यात येणार आहेत. मात्र, ही परीक्षा पध्दती २०१६-१७ च्या शैक्षणिक वर्षाला लागू राहणार असल्याने यावर्षीची शिष्यवृत्ती परीक्षाच रद्द करण्यात आली आहे.शिक्षण हक्क कायद्यान्वये शालांत स्तरावरील गट बदलण्यात आले आहेत. नव्या बदलानुसार आता पहिली ते पाचवीपर्यंत प्राथमिक, तर इयत्ता सहावी ते आठवीपर्यंत उच्च प्राथमिक तसेच इयत्ता नववी ते दहावीपर्यंत माध्यमिक गट अशी विभागणी करण्यात आली आहे. यावर्षी इयत्ता चौथी व इयत्ता सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा यापूर्वी दिली आहे, त्यामुळे शैक्षणिक वर्ष १६-१७ मध्ये शिष्यवृत्ती परीक्षा घेणे योग्य होईल. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षातील शिष्यवृत्ती परीक्षा रद्द करण्यात आली आहे.गतवर्षी जिल्ह्यातून पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेला १३८०९ विद्यार्थी, तर माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षेत ९६३७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. दरवर्षी २३ हजार ४४६ च्या आसपास विद्यार्थी परीक्षेस बसतात. जिल्हा परिषदस्तरावरील शाळांचे विद्यार्थीही शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तुंग यश मिळवतात. मात्र, आता परीक्षा पध्दतीत बदल करण्यात आला आहे. त्यामुळे अभ्यासक्रमही बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर्षी शिष्यवृत्ती परीक्षा नसल्यामुळे पुढील वर्षी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षा द्यावी लागणार आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पुढील वर्षी शिष्यवृत्ती परीक्षा जाहीर केली असली तरी पालकांच्या मनात अद्याप संभ्रम असल्याने पुन्हा पुन्हा खात्री करून घेत आहेत. या साऱ्या प्रकाराने संबंधित विद्यार्थी, पालक गोंधळात पडले आहेत. (प्रतिनिधी)शालांत स्तरात बदल करण्यात आला आहे. पहिली ते पाचवीपर्यंत प्राथमिक, सहावी ते आठवीपर्यंत उच्च प्राथमिकस्तर करण्यात आला आहे. दोन्ही स्तराच्या शेवटच्या वर्षी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. विद्यार्थ्यांची आकलन क्षमता वाढण्याबरोबर परीक्षेसाठी विशिष्ट काठिण्यपातळी निश्चित करण्यात येणार आहे. त्यामुळे शिष्यवृत्तीच्या अभ्यासक्रमात बदल करण्याची शक्यता आहे. यावर्षी शिष्यवृत्ती परीक्षा देता येणार नसल्यामुळे विद्यार्थी व पालकांनी नाराज न होता पुढील वर्षीच्या परीक्षेसाठी सज्ज व्हावे.- एकनाथ आंबोकर, शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग, जिल्हा परिषद, रत्नागिरी.
चालू वर्षातील शिष्यवृत्ती परीक्षा रद्द
By admin | Published: June 26, 2015 11:42 PM