वैभववाडी : उंबर्डेतून कोल्हापूरला कत्तलीसाठी गायी घेऊन निघालेले दोन टेम्पो पोलिसांनी बुधवारी रात्री भुईबावडा-रिंगेवाडी येथे पकडले. दोन टेम्पोतून तब्बल १८ गायींची बेकायदा वाहतूक केली जात होती. टेम्पोतील पळून जाणाऱ्या तिघांना पोलिसांनी पाठलाग करून पकडले. मात्र, अंधाराचा फायदा घेऊन चौथा संशयित आरोपी पसार झाला. टेम्पोसह सुमारे साडेसहा लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन तिघांना अटक केली आहे. बेकायदा जनावरे वाहतुकीविरुद्ध वैभववाडी पोलिसांनी केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, उंबर्डे मेहबूबनगर येथून कत्तलीसाठी गायींची कोल्हापूरकडे वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यामुळे बुधवारी रात्री पोलिस उपनिरीक्षक एस के. घाडगे यांच्या नेतृत्वाखाली हवालदार संजय खाडे, सचिन सापते, दीपक पाटील, कोमल ढाले, दादासाहेब कांबळे यांचे पथक गस्तीवर होते. रात्री दहाच्या सुमारास रिंगेवाडी येथे कोल्हापूरच्या दिशेने निघालेले दोन पिकअप टेम्पो पोलिस पथकाला आढळले. पोलिस उपनिरीक्षक घाडगे यांनी दोन्ही पिकअप टेम्पो थांबविले. त्यावेळी अंधाराचा फायदा घेऊन टेम्पोतील चौघेही पळून जात असताना पोलिसांनी पाठलाग करून त्यातील तिघांना पकडले. तर पिंटू अस्वलवाले(रा. निपाणी) हा चौथा संशयित आरोपी पसार झाला. दोन टेम्पोत तब्बल १८ गायी होत्या. त्यामुळे एम. एच. ०९; बीसी- ९६४३ व एम.एच. ०९; सीए ६३७९ या क्रमांकाचे दोन टेम्पो, तीन हजार रुपये व मोबाईल असा सुमारे साडेसहा लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.कत्तलखान्यासाठी गायींची वाहतूक केल्याप्रकरणी ईशान चाँदसाब सोलापूरे (२३, रा. निपाणी), अब्दुल गुलाब मुल्ला (२९) व किरण विजय चौगुले( २४, दोन्ही रा. यमगरनी, ता. चिक्कोडी- बेळगाव) यांच्याविरुद्ध गोहत्याबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदवून तिघांना अटक केली आहे.त्यांना कणकवली न्यायालयात हजर केले आहे. पोलिसांनी बेकायदा जनावरे वाहतुकीविरुद्ध केलेली सर्वात मोठी कारवाई आहे. वैभववाडी पोलिसांच्या कारवाईचे कौतुक होत आहे. (प्रतिनिधी)
गायी वाहतूक करणारा टेम्पो ताब्यात
By admin | Published: January 06, 2017 12:22 AM