कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपंचायतींसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीची सत्ता मिळवण्याचा निर्धार शिवसैनिकांनी करून त्या काबीज कराव्यात, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले आहे. याच बरोबर, महाविकास आघाडीच्या माध्यमातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, अशी ग्वाहीही त्यांनी दिली आहे. पालकमंत्री उदय सामंत यांचा कणकवली शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोर रविवारी सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी खासदार विनायक राऊत, जिल्हासंपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हाप्रमुख संजय पडते, शिवसेना नेते संदेश पारकर, अतुल रावराणे, कामगार नेते आप्पा पराडकर, गीतेश कडू,राजू शेट्ये,महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत-पालव, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, नगरसेवक सुशांत नाईक, कन्हैया पारकर, राजू राठोड, संदेश सावंत- पटेल,संजना कोलते, माधवी दळवी, दिव्या साळगावकर, सुदाम तेली, प्रसाद अंधारी आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, मी रत्नागिरी जिल्ह्याचा असूनही या जिल्ह्याने मला स्वीकारून योग्य तो मान सन्मान दिला आहे. त्याबद्दल जिल्ह्यातील जनतेचा व शिवसैनिकांचा मी ऋणी आहे. जनतेने टाकलेला विश्वासाला तडा जावू देणार नाही. आमदार दीपक केसरकर यांनी सुरू केलेली चांदा ते बांदा ही योजना बंद पडली आहे. ही योजना सिंधूरत्न या नावाने सुरू करण्याची विनंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आपण करणार आहे.तसेच ही योजना चांदा ते बांदा अशीच राबवावी अशीही मागणी करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, जिल्ह्याचा विकास कोण करू शकतो ? हे जनतेला माहीत आहे, जनताच विरोधकांना घरी बसविल्याशिवाय राहणार नाही. खासदार विनायक राऊत म्हणाले, शिवसैनिकांसाठी आजचा दिवस हा आनंदाचा सोहळा आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उदय सामंत यांच्यावर पालकमंत्री म्हणून जबाबदारी सोपवली आहे. ही जबाबदारी ते सक्षमपणे पार पाडत आहेत. दोन वर्षांच्या कालखंडात जिल्ह्याच्या विकासाठी कोट्यवधीचा निधी त्यांनी उपलब्ध करून दिला आहे. चार नगरपंचायतीच्या व जिल्हा बँक निवडणुकीमध्ये शिवसेना - राष्ट्रवादी आघाडीचा विजय होणार आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले. कामगार नेते आप्पा पराडकर यांनी उदय सामंत यांना स्वामी समर्थांची प्रतिमा व तलवार भेट देत सत्कार केला. संदेश पारकर व इतर पदाधिकाऱ्यांनीही यावेळी सत्कार केला. फोटो ओळ - कणकवली येथे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोर आयोजित सत्कार समारंभाच्यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी मनोगत व्यक्त केले.