वैभववाडी : कुसूर ते नायदेवाडी दिगशी फाट्यानजीक शनिवार,२७ रोजी रात्री उशिरा कार नदीत कोसळली. या अपघातात दोन पोलिस कर्मचाऱ्यांसह चौघे जखमी झाले. नदीकडेला अडकलेल्या चौघांना भाजपच्या हुसेन लांजेकर यांनी गाडीतून बाहेर काढले. जखमीवर कणकवलीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत या अपघाताची नोंद पोलिस ठाण्यात झालेली नव्हती. त्यामुळे त्या चौघांची नावे समजू शकली नाहीत.शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास दोन पोलिस कर्मचारी आणि दोन दुचाकी मॅकेनिक उंबर्डेकडून वैभववाडीकडे येत होते. रस्त्याचा अंदाज न आल्याने ते कुसूर येथे त्यांची कार नदीत कोसळली. एका झाडाला जाऊन ही कार अडकली. त्यामध्ये गाडीतील चौघेही गंभीर जखमी झाले. त्याचवेळी वैभववाडीहून लांजेकर आणि केजीएन मेडिकल स्टोअर्सचे मालक जलाउद्दिन लांजेकर आपले काम आटोपून घरी कोळपे येथे जात होते. त्यांना नदीकाठी एक कार कोसलेली दिसली. त्यांनी आपली कार थांबवून जवळ जाऊन पाहिले असता कारमध्ये चार प्रवाशी अडकून पडले होते. कारचे दरवाजे आतून उघडत नव्हते.हुसेन व जलाउद्दिन लांजेकर यांनी प्रसंगावधान राखत कारमध्ये अडकलेल्या या चौघांना कारमधून सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर तातडीने त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथून त्यांना कणकवलीतील खासगी रुग्णालयात हलविले आहे. अपघातात दोन पोलिस कर्मचाऱ्यांसह चौघेजण जखमी झालेल्या या अपघाताची सायंकाळी उशिरापर्यंत पोलिसात नोंद झाली नव्हती.भीषण दुर्घटना टळलीही कार जिथे कोसळली त्या ठिकाणी नदीचा २० फुटापेक्षा अधिक खोल डोह आहे. जर ही कार त्या डोहात कोसळली असती तर कदाचित चौघांच्याही जिवावर बेतले असते. परंतु, सुदैवाने ही कार एका झाडाला अडकल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
Sindhudurg: कुसूर येथे कार नदीत कोसळली; दोन पोलिस कर्मचाऱ्यांसह चार जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 1:02 PM