लोकमत न्यूज नेटवर्क मालवण (जि. सिंधुदुर्ग) : नौदल दिनानिमित्त समुद्रकिनाऱ्यावरील राजकोट परिसरात आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा सोमवारी दुपारी मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे कोसळला आणि अवघा महाराष्ट्र हळहळला. व्यवस्थेविरुद्ध संताप व्यक्त करीत शिवप्रेमींनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोलिस बंदोबस्तही वाढविण्यात आला असून, कोणालाही जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
नौदल दिनानिमित्त दि. ४ डिसेंबर २०२३ रोजी नौदल विभागाने राजकोट परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारला होता. हा पुतळा शिवप्रेमींसाठी आकर्षण ठरला होता. गेले दोन, तीन दिवस किनारपट्टीवर वादळी वारे आणि मुसळधार पाऊस सुरू आहे. यातच दुपारी वादळीवाऱ्यामुळे पुतळा कोसळला. हा प्रकार स्थानिकांच्या लक्षात येताच त्यांनी याची माहिती प्रशासनास दिली. त्यानंतर स्थानिक महसूल तसचे पोलिस अधिकारी त्वरित घटनास्थळी दाखल झाले. २८ फूट उंच पुतळा होता छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पूर्णाकृती पुतळा सुमारे ४३ फूट उंच होता. जमिनीपासून चबुतरा बांधकाम १५ फूट तर त्यावर २८ फूट उंच पुतळा उभारण्यात आला होता. सुशोभीकरण आणि इतर व्यवस्थेसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली कार्यालयाने सुमारे पाच कोटी रुपये खर्च केले होते.
लोखंडी अँगल अर्धवट
पुतळ्याच्या चौथऱ्यासाठी १५ फूट खोलीचे लोखंडी अँगल टाकून पक्के बांधकाम करण्यात आले होते. त्यावर पुतळ्याचे पार्ट (अवयव) जोडण्यात आले. जमिनीतून उभारण्यात आलेले अँगल पुतळ्याच्या छातीपर्यंत उभारले असते तर पर पुतळा कोसळून पडला नसता, असे मत स्थानिक बांधकाम व्यावसायिकांमधून व्यक्त होत आहे.
नटबोल्ट गंजले आहेत; २० ऑगस्टला नौदलाला पाठविले होते पत्र
- मालवणमधील सार्वजनिक बांधकाम उपविभागाने २० ऑगस्ट रोजी नौदलाचे विभागीय सुरक्षा अधिकारी कमांडर अभिषेक कारभारी यांना पत्र पाठवून पुतळ्याबाबत तत्काळ उपाययोजना करण्यास कळविले होते.
- ४ डिसेंबर २०२३ रोजी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. त्यानंतर जूनमध्ये कल्याणचे शिल्पकार जयदीप आपटे यांच्याकडून डागडुजी करण्यात आली. पुतळ्याचे जॉईंट करण्यासाठी नट-बोल्टचा वापर केला होता. पण आता पाऊस आणि खारे वारे यामुळे त्या नट- बोल्टना गंज पकडला असून त्यामुळे पुतळा विद्रूप दिसत आहे. तेव्हा संबंधित शिल्पकारांना सांगून कायमस्वरुपी उपाययोजना तत्काळ कराव्यात, असे पत्रात म्हटले होते.
पुतळा पुन्हा उभारणार
झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि आमची अस्मिता आहे. हा पुतळा नौदलाने उभारला होता. या घटनेबाबत मी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली तेव्हा त्यांनी ४५ किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा वाहत होता. त्यामुळे पुतळ्याचे नुकसान झाल्याचे सांगितले. पुन्हा तिथे महाराजांचा पूर्णाकृती पुतळा दिमाखात उभा करू
- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
घाई केल्याने पुतळा कोसळला : संभाजीराजे
उद्घाटन करण्यासाठी घाई केल्यानेच पुतळा कोसळला, अशी टीका माजी खासदार संभाजीराजे यांनी केली. उशीर होऊ दे, पण शास्त्रोक्त पद्धतीने या स्मारकाची पुनर्बाधणी झाली पाहिजे. आता त्याठिकाणी पुनश्च महाराजांचे उचित स्मारक उभारणे गरजेचे आहे. पण, निवडणुकीच्या आधी ते उभारण्याच्या ईष्र्येत परत गडबड करू नये, असे ते म्हणाले.