रेडी : रेडी बंदरामध्ये लोहखनिज माल घेऊन जाणारे विदेशी जहाज बुधवारी दाखल झाले. पावसाळ्यानंतर प्रथमच हे जहाज आल्याने समुद्री वाहतुकीच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. रेडी गावामध्ये पावसाळ्यामध्ये वाहतूक बंद करण्यात आली होती. पावसाळा संपल्याने बंदरातील वाहतूक सुरू होण्याची प्रतीक्षा होती. या हंगामातील प्रथमच लोहखनिज निर्यात हंगाम सुरू झाला असून, चालू हंगामातील ‘अॅक्वा प्रॉसपर’ हे ५५,००० मेट्रिक टन लोहखनिज क्षमतेचे विदेशी जहाज बुधवारी रेडी बंदरामध्ये दाखल झाले आहे. या विदेशी जहाजामध्ये रेडी गावातील आय.एल.पी.एल. या खाण कंपनीचे लोहखनिज आज (गुरुवार) चढवून चीनला निर्यात करण्यात येणार आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लोहखनिजाचे भाव गडगडल्याने चालू खनिज निर्यात हंगामामध्ये लोहखनिज निर्यातीवर विपरीत परिणामाची दाट शक्यता आहे. या हंगामामध्ये कळणे, साटेली ते रेडी बंदरापर्यंत लोहखनिज ट्रान्स्पोर्ट सुरू झालेला नाही. त्यामुळे ट्रक डंपर मालक, चालक, व्यावसायिक चिंतेत आहेत. (वार्ताहर)
रेडी बंदरामध्ये मालवाहू जहाज दाखल; हंगाम सुरू
By admin | Published: November 11, 2015 11:09 PM