नांदगांव : सलग दोन दिवस मुंबई-गोवा चौपदरीकरण जमीन सर्वेक्षणाचे काम ग्रामस्थांनी बंद पाडले. मात्र तळेरे औंदुबरनगर येथील ७०० मीटर व कासार्डे आनंदनगर येथील संपूर्ण मोजणी करण्यात आली. ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जात मोजणी करण्यात आली. मात्र कासार्डे व तळेरे परिसरातील उर्वरित मोजणी होऊ शकली नाही. यावेळी ही मोजणी पोलीस बंदोबस्तात पूर्ण केली.मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी लागणाऱ्या जमिनीची मोजणीची प्रक्रिया सध्या सुरु आहे. सध्याच्या मार्गाच्या मध्यबिंदूपासून दोन्हीकडे किती जमीन संपादित करणार आहे? शिवाय, काही भागात जास्त तर काही ठिकाणी कमी जागा संपादित करण्यात येत असल्याने याबाबत आक्षेप घेण्यात आला. शिवाय या संपादित जमिनीचा मोबदला किती मिळणार? याबाबतही साशंकता असल्याने तळेरे व कासार्डे ग्रामस्थांनी आपल्या शंकांचे समाधान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही ही मोजणी होऊ देणार नसल्याचा पवित्रा घेतला. यावेळी खारेपाटण सार्वजनिक बांधकामचे डी. जी. कुमावत, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत लांगी, भूमापक विश्राम सावंत, एस. एस. गोलतकर, वानखेडे, व्ही. व्ही. सावंत, तलाठी दीपक पावसकर, तळेरे चौपदरीकरण प्रकल्पग्रस्त समितीचे अध्यक्ष राजू जठार, उपाध्यक्ष बापू डंबे, अशोक कोकाटे, उपसरपंच शशांक तळेकर, शरद कर्ले, विनायक कल्याणकर, बाळा कल्याणकर, अमोल कल्याणकर, प्रकाश जमदाडे, प्रविण वरुणकर यांच्यासह असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. या चौपदरीकरणासाठी सातत्याने होणारा विरोध लक्षात घेऊन व चुकीची प्रक्रिया चालू असल्याने प्रांताधिकारी संतोष भिसे यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्यात आला व या प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी बोलविण्यात आले. मात्र प्रारंभी येतो असे त्यांनी सांगितले. यानंतर पुन्हा दूरध्वनीवरून मला येणे शक्य होणार नाही असे सांगत जबाबदारी घेतली नाही. (वार्ताहर)
कासार्डे, तळेरेतील उर्वरित मोजणी पूर्ण
By admin | Published: June 04, 2015 11:15 PM