कुडाळ : बैल झुंज लावून बैलांना जखमी केल्याप्रकरणी नेरूर येथील आसीम मुजावर व रुपेश पावसकर या दोघांवर कुडाळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कुडाळ पोलिसांना सिंधुदुर्गनगरी पोलिसाकडून नेरूर दुर्गावाड परिसरात बैलाच्या झुंजी लावल्या जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार रविवारी सकाळी दहा वाजता कुडाळचे पोलीस नेरूर दुर्गावाड येथे गेले असता एका मैदानावर बैलांच्या झुंजी स्पर्धा चालत असल्याचे निदर्शनास आले. तेथेच उभ्या असलेल्या बैलाच्या पोटाला जखमही झाली होती व त्यातून रक्तही वाहत होते. हे चित्र पाहून पोलिसांनी बैलाच्या झुंजीचे आयोजन कोणी केले असे विचारले असता, उपस्थितांनी जय जवान जय किसान संघर्ष शेतकरी मंडळाच्यावतीने आसीम अब्दुल्ला मुजावर (रा. दुर्गावाड नेरूर) व रुपेश पावसकर (नेरूर) यांनी आयोजित केल्याची माहिती दिली. या माहितीनुसार कुडाळ पोलिसांनी बैलांच्या झुंजी लावून एका बैलाला जखमी करून त्याला वेदना व पीडा होतील, अशा तऱ्हेने सार्वजनिक मनोरंजनासाठी निर्दयतेने वागविले आहे. म्हणून प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियमाप्रमाणे आसीम मुजावर व रुपेश पावसकर यांच्यावर कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
बैल झुंजीप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल
By admin | Published: March 15, 2015 9:45 PM