कणकवली : कणकवलीतील अप्पासाहेब पटवर्धन चौकात सेवा बजावत असलेल्या वाहतूक शाखेच्या पोलिसांवर शनिवारी सायंकाळी पेट्रोल ओतणार्या त्या अल्पवयीन मुलावर कणकवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा मुलगा अल्पवयीन असल्याने पोलिसांनी त्याला शनिवारी मध्यरात्रीनंतर कुडाळ येथील बाल न्यायालयात हजर केले. या न्यायालयाकडून त्याला योग्य त्या अटी, शर्तींवर आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले.कणकवली शहरातील अप्पासाहेब पटवर्धन चौकात शनिवारी सायंकाळी सेवा बजावत असलेले वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार विश्वजीत परब व चंद्रकांत माने तसेच नगर पंचायत कर्मचारी प्रदीप गायकवाड यांच्या अंगावर पाठीमागून येऊन या अल्पवयीन मुलाने पेट्रोल ओतले होते. पोलिसांनी विरूद्ध दिशेने महामार्गावरून जाणार्या या मुलाला अडविल्याच्या रागातून त्याने हे कृत्य केले होते.अचानक झालेल्या या प्रकारानंतर स्थानिक नागरिकांनी त्याला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले होते.पोलिसांनी माहिती घेतली असता, तो अल्पवयीन असल्याचे समजले. वाहतूक शाखेचे पोलीस व नगर पंचायत कर्मचार्याने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी या मुलावर शनिवारी रात्री सरकारी कामात अडथळा आणणे, प्राणघातक हल्ला करणे तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना दुखापत करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याला बाल न्यायालय, कुडाळ येथे रात्री उशिरा हजर केले.
या न्यायालयाकडून त्याला योग्य त्या अटी व शर्तींवर आई-वडिलांच्या ताब्यात दिले. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक ए. आय. मुल्ला करत आहेत. दरम्यान, शनिवारी रात्री पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. नितीन कटेकर यांनी घटनास्थळी भेट देत फॉरेन्सिक लॅबच्या पथकासह काही पुरावे गोळा केले होते. जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी ही घटना गांभिर्याने घेतली असून त्या दृष्टीने अधिक तपास केला जात आहे.