कणकवली : कणकवली तालुक्यातील एका गावातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी संशयीत आरोपी सचिन उर्फ पपल्या महादेव चाळके (३६, बेळणेखुर्द, वरचीवाडी) याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा २६ जानेवारी ते ४ एप्रिल २०१९ या कालावधीत घडला असुन संशयिताविरोधात विनयभंग केल्याप्रकरणी विविध कलमांबरोबरच बालकाचे लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा २०१२ (८)(१२) (पॉस्को)अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, कणकवली पोलीसांनी संशयित आरोपीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पिडीत मुलगी ही सातवीत शिकत असुन संशयीत आरोपी सचिन चाळके हा गेल्या दोन महिन्याच्या कालावधीत तीचा चोरुन पाठलाग करत होता. एकदा वाटेत अडवुन तुझ्या पप्पांना व भावाला ठार मारुन टाकेन, अशी धमकीही पिडीत मुलीला त्याने दिली होती. मोबाईलवर अश्लिल मेसेज करत संशयीत आरोपीने पिडित मुलीला एकांतात गाठुन अश्लिल संभाषण करत तिचा विनयभंगही केला होता.
त्यामुळे घडलेला प्रकार त्या घाबरलेल्या मुलीने नातेवाईकांच्या कानावर घातला. त्यानुसार कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी संशयित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सचिन चाळके याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणाचा अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.