सावंतवाडी : काजू बी ला हमीभाव मिळत नसल्यानेच काजू बागायतदार शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींनी दक्षिण आफ्रिकेत जाऊन प्रचार करावा अशा प्रकारचे फलक लावले आहेत अशी माहिती सिंधुदुर्ग शेतकरी व फळबागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत यांनी दिली आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी गैरसमज करून देत आहेत. ते म्हणाले त्या प्रमाणे उध्दव शिवसेने कडून हे फलक लावले नसून शेतकऱ्यांमधून हे फलक लावण्यात आले असा खुलासा सावंत यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केला आहे.काजूच्या हमीभावावरून लावण्यात आलेल्या फलकामुळे राजकीय मंडळी संभ्रमित झाली आहेत. सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना इशारा देण्यात आला आहे. हा नुसता ट्रेलर आहे. शेतकऱ्यांना जी आश्वासने दिली ती पाळली गेली नाहीत तर विधानसभेला संपूर्ण सिनेमा दाखविला जाईल असेही या पत्रकात म्हटले आहे.दीपक केसरकर यांनी काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत जे विधान केलं आहे ती शेतकऱ्यांची व कारखानदारांची बैठक लावली त्यामध्ये कमीत कमी १२० रुपये दर ठरला, हे जरी सत्य असलं तरीही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुठच्याही कारखानदाराने दीपक केसरकर सांगितल्याप्रमाणे काजू खरेदी केली नाही. उलट काजू बी बघायला नेऊन त्यामध्ये त्रुटी काढून ह्या काजू ११०-११२ रुपये प्रति किलो प्रमाणे देण्याची कारखानदारांनी मागणी केली आहे, असे त्यांनी सांगितले.सिंधुदुर्ग शेतकरी व फळबागातदार संघाने स्वतःच्या हिंमतीवर जिल्ह्याबाहेरील पुणे,,नासिक, आजरा, चंदगड, गोवा येथील कारखानदारांना सुमारे २३० टनाच्या आसपास काजू १२० रुपये प्रति किलो तर काही काजू बी १२५ ते १२८ दराने विकली गेली आहे. जिल्ह्यातील कारखानदारांना दीपक केसरकर यांनी दिलेला शब्द पाळला नाही, ही खरी शोकांतिका आहे. खरंतर शेतकरी संघटनेकडून जो फलक लावण्यात आला त्या सभासदांचे खरोखर कौतुक केले पाहिजे असेही सावंत यांनी सांगितले.
काजू बागायतदारांनीच फलक लावला, दीपक केसरकर यांचे आरोप चुकीचे - विलास सावंत
By अनंत खं.जाधव | Published: May 04, 2024 7:48 PM