सिंधुदुर्ग : खादी ग्रामोद्योगाच्या आर्थिक मदतीच्या जोरावर पिंगुळी येथील पौर्णिमा चंद्रकांत सावंत यांनी काजू प्रक्रिया उद्योग सुरु करुन स्वयंपूर्णतेकडे वाटचाल केली आहे. ‘कोकण्स किंग’ या ब्रँडने आता कुटुंबाला चांगलाच हातभार लावला आहे.खादी ग्रामोद्योगाच्या माध्यमातून १० लाख रुपये मदतीच्या जोरावर पौर्णिमा सावंत यांनी बांधकाम करुन आवश्यक असणारी मशीनरी विकत घेतली आणि काजू प्रक्रिया उद्योग सुरु केला. खानोली, आसोली, वेंगुर्ला भागातील थेट शेतकऱ्यांकडून काजू विकत घेतले जातात. त्यावर प्रक्रिया करुन ‘कोकण्स किंग’ हा ब्रँड विकसित केला. प्रक्रिया झालेला हा काजू डोंबिवली, दिवा, गोवा आणि स्थानिकस्तरावर विक्री केला जातो. कोरोनाच्या कालावधीत २ वर्षांचा लॉकडाऊन वगळल्यास सध्या आपल्या ब्रँडला बाजारपेठेत चांगली मागणी असल्याचे श्रीमती सावंत यांनी सांगितले. या प्रक्रिया उद्योगासाठी घरातील सदस्यांसोबतच बाहेरील दोघाजणांचे सहकार्य लाभले आहे. खादी ग्रामोद्योगांने केलेल्या आर्थिक मदतीने या उद्योगाची वाटचाल सुरु झाली आहे. त्याबद्दल आभार मानून भविष्यातही हा ब्रँड अधिक विकसित करुन राज्यभर घालविण्याचा मनोदय आहे.यासाठी निश्चितपणे शासनाचेही पाठबळ लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.घरातील महिला कुटुंबप्रमुखाच्या जोडीनेच काजू प्रक्रियेसारखा उद्योग सुरु करुन कुटुंबाचा आर्थिक कणा बनू शकते. शिवाय छोटा का असेना या उद्योगाच्या माध्यमातून दोघाजणांना रोजगार देवू शकते. हे श्रीमती सावंत या काजू प्रक्रिया उद्योगातून दाखवून दिले आहे. नवउद्योजकांनी दखल घ्यावी : सातपुतेया छोट्या उद्योगातून कुटुंबाला आर्थिक हातभार लावताना या उद्योगासाठीही कुटुंबातील सदस्यांचाही तितकाच सहकार्याचा हातभार महत्त्वाचा आहे, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. निश्चितच या उद्योजिकेची दखल नवउद्योजकांनी, कुटुंबांनी आणि बेरोजगारांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी केले आहे.
काजू प्रक्रिया उद्योगातून कुटुंबाला हातभार, पिंगुळी येथील पौर्णिमा सावंत यांची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: May 03, 2023 6:29 PM