देवगड : देवगड पंचायत समिती कार्यालयातील जिल्हा परिषद शिक्षण विभागातील कनिष्ठ लिपिक महेंद्र एकनाथ वाडेकर (वय ४६) याला वेतन फरकाच्या रकमेच्या बिलाच्या मंजुरीकरिता ५०० रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले. ही कारवाई सोमवारी सायं. ४ वा. करण्यात आली. देवगडमध्ये महिन्यातील ही दुसरी घटना आहे. जामसंडे केंद्रप्रमुख सुदाम म्हादू जोशी यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सिंधुदुर्ग यांच्याकडे तक्रार केल्यानुसार त्या विभागामार्फत सापळा रचून देवगड पंचायत समिती जिल्हा परिषद शिक्षण विभागात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. जामसंडे केंद्रप्रमुख जोशी यांचा २०१४ सालच्या वेतन फरकाची रक्कम मंजूर करण्यासाठी वाडेकर यांनी ५०० रुपयांची मागणी केली होती. या संदर्भात जोशी यांनी लाचलुचपत विभागाशी संपर्क साधून त्यांच्याकडे तक्रार केली होती. तक्रारीनुसार ही कारवाई पार पडली. या कारवाईत ठाणे विभागीय पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, उपअधीक्षक श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग अधीक्षक मुकुंद हातोटे, पोलीस निरीक्षक मितेश केणी, सहाय्यक पोलीस निरीक्षक एल. टी. राणे, पोलीस नाईक मकसूद पिरजादे, हवालदार विलास कुंभार, कोरगांवकर, पोलीस शिपाई सुमित देवळेकर, आशिष जामदार यांचा सहभाग होता. वाडेकर यांना मंगळवारी जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर केले जाणार आहे. रात्री उशिरापर्यंत देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती. देवगडात महिन्याभरातील दुसरी घटना महेंद्र वाडेकर हे देवगड पंचायत समिती शिक्षण विभागात गेल्या चार वर्षांपासून कनिष्ठ लिपिक पदावर काम करत होते. त्यापूर्वी ते विजयदुर्ग ग्रामपंचायतीमध्ये शिपाई म्हणून कार्यरत होते. खात्यांतर्गत आरोपी व तक्रारदार असणारी ही पहिलीच घटना असल्याचे सांगण्यात येत आहे. तक्रारदार केंद्रप्रमुख सुदाम जोशी हे अपंग आहेत. देवगड तालुक्यामध्ये ही महिनाभरामधील दुसरी घटना आहे. यापूर्वी पडेल तलाठी सावंत यांच्यावर सिंधुदुर्ग लाचलुचपत विभागाने कारवाई केली होती.(प्रतिनिधी)
देवगड येथे लिपिकास लाच घेताना पकडले
By admin | Published: September 14, 2015 11:47 PM