गुहागर : भांडुप, मुंबई येथील चाळीतील मित्रांना घेऊन गावी फिरायला आलेल्या तरुणाचा गुहागर समुद्रात बुडून मृत्यू झाला. निलेश रामचंद्र बांद्रे (२७) असे या तरुणाचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी ४ वाजता ही दुर्घटना घडली. चिपळूण तालुक्यातील कापरे - भोम हे निलेश बांद्रे याचे मूळ गाव असून आपल्या आई-वडीलांसह तो भांडूप, कोकणनगर येथील सिंहगड चाळीत रहात होता. शुक्रवारी चाळीतील सात मित्रांसह तो आपल्या मूळ गावी कापरे येथे आला होता. शुक्रवारी गावात फिरुन शनिवारी गुहागर-हेदवी आदी ठिकाणी फिरण्याचा त्यांनी बेत आखला. त्यानुसार शनिवारी हेदवी वेळणेश्वर आदी ठिकाणी देवदर्शन केल्यानंतर दुपारी ते गुहागर येथे पोहोचले. दुपारी पाण्यात पोहण्यासाठी उतरले. पोहून झाल्यानंतर ते समुुद्र किनाऱ्यावरील स्टॉल्सजवळ एकत्र बसले होते. यादरम्यान निलेश त्याच्यासह आलेली सहावी व आठवीत शिकत असलेल्या दोन मावस भावांना समुद्राच्या पाण्यात खेळताना पाहुन त्यांना बाहेर आणण्यासाठी गेला. यावेळी जेटीच्या टोकावरील निसरड्या भागावरुन घसरुन तो पाण्यात कोसळला अशी माहिती त्याचा मित्र जयेश पेरवी (२०) याने दिली. पाण्यात पडल्यानंतर काही वेळातच तो किनाऱ्यावर लागला. निलेशला ग्रामस्थांनी ग्रामीण रुग्णालयात नेले. परंतु तेथील वैद्यकिय अधिकारी डॉ. बळवंत यांनी तो मयत झाल्याचे सांगितले. (वार्ताहर)