रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत १० ते १४ नोव्हेंबर २०१६ या कालावधीत जमा झालेल्या जुन्या चलनातील ११२ कोटी रुपयांच्या व्यवहारांची सीबीआयच्या पथकाने गुरुवारी बँकेच्या माळनाका संगणकीय शाखेत सुरू केलेली तपासणी शुक्रवारी दुपारी पूर्ण झाली. दोन अधिकारी व तीन संगणकतज्ज्ञ अशा पाचजणांच्या पथकाने ही तपासणी केली. त्यानंतर सीबीआयचे पथक परतले आहे. रत्नागिरी जिल्हा बॅँकेत जमा झालेल्या पाचशे व हजारांच्या जुन्या नोटांचे व्यवहार नाबार्डमार्फत पंधरा दिवसांपूर्वीच तपासण्यात आले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या पाच दिवसांत जमा झालेले ११२ कोटींचे जुने चलन रिझर्व्ह बॅँकेच्या निर्देशांनुसार जिल्हा बॅँकेने १५ नोव्हेंबर २०१६ रोजी स्टेट बॅँकेच्या रत्नागिरी मुख्यालयात जमा केले होते. मोठ्या प्रमाणात जिल्हा बॅँकेत जमा झालेली रक्कम ही जिल्ह्यात सक्षमपणे काम करणाऱ्या अनेक पतसंस्थांची असल्याचेही स्पष्ट झाले आहे. राज्यातील काही जिल्हा मध्यवर्ती बॅँका अद्याप जुन्या नोटा स्वीकारत आहेत, अशा बातम्या प्रसारमाध्यमांमधून येत आहेत. नोटा बदलून देताना कमिशन घेणाऱ्या राष्ट्रीयीकृत बॅँकांच्या अधिकाऱ्यांवर गेल्या काही दिवसांत गुन्हेही दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील जिल्हा बॅँकांमध्ये १० ते १४ नोव्हेंबर २०१६ यापाच दिवसांत जमा झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या जुन्या चलनाचे व्यवहार शासनाच्या विविध वित्त संस्थांकडून तपासले जात आहेत. नाबार्डने जिल्हा बॅँकेच्या व्यवहारांची तपासणी केल्यानंतर रत्नागिरीत सीबीआयकडूनही व्यवहारांच्या संगणकीय तपशीलांची तपासणी करण्यात आली. जिल्हा बॅँकेच्या अधिकाऱ्यांनी पथकाच्या तपासणीला पूर्ण सहकार्य करण्याच्या सूचना बँकेच्या अध्यक्षांनी दिल्या होत्या. त्यानुसार ही तपासणी पूर्ण झाली आहे. (प्रतिनिधी)
‘सीबीआय’ची जिल्हा बॅँकेतील तपासणी पूर्ण
By admin | Published: December 23, 2016 11:16 PM