मालवण : कोरोनाच्या वाढलेल्या संसर्गामुळे सध्या धार्मिक विधींवर बंधने असल्याने आज रामनवमी निमित्त ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गसह मालवण तालुक्यातील विविध मंदिरांमध्ये रामनवमी उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने व मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले.कोरोनाच्या संकटामुळे प्रशासनाने रामनवमी उत्सव कोरोनाचे सर्व नियम पाळून तसेच कमी भाविकांच्या उपस्थितीत साजरा करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार आज मालवण येथील किल्ले सिंधुदुर्गसह शहरातील भरड येथील दत्तमंदिर, बसस्थानक, गवंडीवाडा, मेढा येथील राममंदिर तसेच तारकर्ली येथील महापुरुष मंदिर, आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वर मंदिर, कांदळगाव येथील रामेश्वर मंदिरसह तालुक्यातील अन्य मंदिरांमध्ये रामनवमी उत्सव साजरा करण्यात आला.
भाविकांनीही मंदिरांमध्ये गर्दी न करता उत्सवात सहभाग दर्शवित दर्शनाचा लाभ घेतला. दरवर्षी मंदिरांमध्ये रामनवमी उत्सवाच्या निमित्ताने कीर्तन, अन्य सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले जातात. मात्र यावर्षी हे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.