मालवण : छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या जयघोषात आज ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गचा ३५३ वा वर्धापनदिन किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्यावतीने शेकडो शिवप्रेमी, पर्यटकांच्या उपस्थितीत दिमाखात साजरा झाला. किल्ल्यावर सादर केलेले मर्दानी खेळ शिवप्रेमींसाठी लक्षवेधी ठरले होते.किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्यावतीने किल्ले सिंधुदुर्गचा वर्धापनदिन दरवर्षी विविध कार्यक्रमांनी साजरा केला जात आहे. ३५३ व्या वर्धापन दिनानिमित्त आज किल्ल्याची पायाभरणी झालेल्या दांडी येथील मोरयाचा धोंडा येथे शुक्रवारी सकाळी उद्योजक संजय गावडे यांच्या हस्ते मोरयाचे पूजन करण्यात आले.
यावेळी किल्ले प्रेरणोत्सव समितीचे गुरू राणे, प्रदीप वेंगुर्लेकर, भाऊ सामंत, रत्नाकर कोळंबकर, दत्तात्रय नेरकर, प्रा. आर. एन. काटकर, रसिका तळाशिलकर, रविकिरण आपटे, संदीप साळोखे, हरीश गुजराथी, गुजराथी यांच्यासह अन्य शिवप्रेमी, पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित होते.दांडी येथील मोरयाचे पूजन झाल्यानंतर समुद्रास श्रीफळ अर्पण करण्यात आले. त्यानंतर किल्ल्यावरील हनुमान मंदिरात भाऊ सामंत यांच्या हस्ते पूजन झाले. शिवराजेश्वर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या जयघोषाने संपूर्ण किल्ला परिसर दणाणून सोडण्यात आला. मोठ्या संख्येने शिवप्रेमी या सोहळ्यात सहभागी झाले होते.शिवप्रार्थनेने सांगताशिवराजेश्वर मंदिर परिसरात मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. याला शिवप्रेमी तसेच पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिवप्रार्थनेनंतर या सोहळ्याची सांगता झाली. सोहळ्यासाठी गर्दी झाली होती.