- महेश सरनाईक सिंधुदुर्ग : कोकण रेल्वे महामंडळाच्या वतीने ३३ वा स्थापना दिवस वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटर सभागृहात साजरा करण्यात आला. स्थापना दिवसासह राष्ट्राला समर्पित असलेल्या अविरत सेवेची २५ वर्षे देखील कोकण रेल्वेने पूर्ण करून एक महत्वाचा टप्पा गाठला आहे. यानिमित्ताने कोकण रेल्वे व्यवस्थापनाच्या २५ वर्षांच्या अखंडीत सेवापूर्ती निमित्त महामंडळातील अधिकारी- कर्मचारी यांचा विशेष सत्कार कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी कोकण रेल्वेचे संचालक राजेश भडंग (फायनान्स), संतोष कुमार झा (ऑपरेशन्स, कमर्शिअल ), आर. के.हेगडे (वे-वर्कस्) व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी कोकण रेल्वेचे उपमहाव्यवस्थापक (जनसंपर्क) गिरीश करंदीकर, कार्यकारी संचालक (प्रकल्प) एल. प्रकाश, डेप्युटी लेखा अधिकारी अरूप बागुई यांच्यासह विविधविभागात उल्लेखनीय काम केलेल्या विभागांना तसेच वैयक्तिक कामगिरी केलेल्या अधिकारी-कर्मचारी यांचा स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमात उल्लेखनीय कामासाठी कोकण रेल्वे जनसंपर्क विभागाला देखील पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सदर सोहळ्यास कोकण रेल्वेच्या सर्व विभागातील विभागप्रमुख, अधिकारी-कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
गिरीश करंदीकर विशेष पुरस्काराने सन्मानितकोकण रेल्वेच्या ३३ व्या स्थापना दिनाचे औचित्य साधत कोकण रेल्वेच्या स्थापने पासून रेल्वेसाठी मोठ योगदान देणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले.कोकण रेल्वेच्या जनसंपर्क विभागाचे उपमहाप्रबंधक गिरीश करंदीकर यांना यावेळी कोकण रेल्वेचे चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांच्या हस्ते आणि अन्य संचालकांच्या उपस्थितीत विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.