कुडाळ : सध्याच्या शिक्षण प्रणालीनुसार बारावीनंतर व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना नीट, जेईई आदी परीक्षा देणे आवश्यक आहे. मात्र, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षांची परीक्षा केंद्रे सिंधुदुर्ग जिल्ह्यात नसल्याने विद्यार्थी मागे पडत आहेत.
अशा महत्त्वाच्या परीक्षांचे केंद्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात होण्यासाठी महाराष्ट्र शासनाने शिफारशीसह केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर करावा, अशी मागणी कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
याबाबत उदय सामंत यांनी सकारात्मक चर्चा करीत या परीक्षा केंद्रांबाबत केंद्रशासनाला शिफारस करण्याचे आदेश प्रधान सचिवांना दिले आहेत. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना या परीक्षा देण्यासाठी कोल्हापूर अथवा गोवा येथे जावे लागते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे हे परीक्षा केंद्र मिळाल्यास जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना नीट, जेईई परीक्षा देणे सोयीचे होईल. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने शिफारशीसह केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर करावा, जेणेकरून केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणे सोयीचे होईल, अशी मागणी आमदार नाईक यांनी केली.त्याबाबत प्रधान सचिवांना या परीक्षा केंद्राबाबत केंद्रशासनाला शिफारस करण्याचे आदेश उदय सामंत यांनी दिले असल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.अभ्यासकेंद्रे नसल्याने विद्यार्थी मागेसिंधुदुर्ग जिल्हा हा भारतातील शंभर टक्के साक्षर जिल्हा व पहिला पर्यटन जिल्हा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इयत्ता दहावी-बारावीमधील विद्यार्थी कोकण बोर्डात नेहमी अव्वल असतात. मात्र, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षांची परीक्षा केंद्रे सिंधुदुर्ग जिल्ह्यात नसल्याने व्यावसायिक अभ्यासक्रमात विद्यार्थी मागे पडतात. पुढील काळात शैक्षणिक विकास होण्यासाठी व्यावसायिक अभ्यासक्रमास विद्यार्थी जाणे गरजेचे आहे. त्यासाठी अशा महत्त्वाच्या परीक्षांचे केंद्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात असणे आवश्यक आहे. याकडे आमदार वैभव नाईक यांनी उदय सामंत यांचे लक्ष वेधले.