कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या संकल्पनेतून गोरगरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यातील गरीब मुलांना सीईटीच्या परीक्षेत गुण कमी मिळतात. त्यामुळे प्रवेश घेताना या मुलांना मोठ्या अडचणी येत असतात. त्यासाठीच 'लक्षवेध' सीईटी सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. या सराव परीक्षेच्या माध्यमातून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना गुणवत्ता सिद्ध करता येईल, असे मत जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी व्यक्त केले.हरकुळ खुर्द येथील एसएसपीएमच्या सभागृहात सिंधुदुर्ग जिल्हा बँक व एसएसपीएम कॉलेज यांच्या संयुक्तविद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी लक्षवेध सराव परीक्षेचा प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कॉलेजचे संचालक डॉ. मिलिंद कुलकर्णी, प्राचार्य ए. के. भट, रजिस्ट्रार सागर सईकर, जिल्हा बँक मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, प्रा. डी. पी. म्हापसेकर, प्रा. सचिन वंजारी, प्रा. समीर वायंगणकर, प्रा. दर्शन म्हापसेकर, प्रा. वेलिम, बँक व्यवस्थापक आनंद सावंत आदी उपस्थित होते.सतीश सावंत म्हणाले, सिंधुदुर्गातील गोरगरीब विद्यार्थ्यांच्यादृष्टीने ही सराव परीक्षा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सिंधुदुर्गाच्यादृष्टीने शेतकऱ्यांच्या मुलांसाठी ही सराव परीक्षा आयोजित केली असून ज्यांना चांगले गुण मिळतील त्यांना फी मध्ये सवलत असते, पण सिंधुदुर्गात सीईटी सराव परीक्षा यापूर्वी झाली नसल्यामुळे त्याचा फटका अनेक विद्यार्थ्यांना बसलेला आहे. येत्या ५ मे ला मुख्य सीईटी परीक्षा होत आहे. त्यादृष्टीने जिल्हा बँकेने ही आयोजित केलेली सीईटी सराव परीक्षा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. जिल्ह्यातील ११०० विद्यार्थ्यांनी या सराव परीक्षेसाठी नावनोंदणी केलेली आहे. या सराव परीक्षेतून उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना संधी निर्माण होणार आहे. या सगळ्या विद्यार्थ्यांनी जिल्हा बँकेची बचत खाती काढून ठेवली पाहिजेत. सीईटी परीक्षेचा निकाल येताच प्रवेशासाठी इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज इथेच असल्यामुळे जिल्हा बँक शेतकऱ्यांच्या नावे सात-बारा असलेल्या मुलांना दोन लाखांचे विनातारण कर्ज शिक्षणासाठी देणार आहे. सूत्रसंचालन अमित परब यांनी केले. (वार्ताहर)पाच मे रोजी एमएचटी-सीईटी परीक्षा मुंबई विद्यापीठाच्या सीईटी परीक्षेचे केंद्र एसएसपीएम कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग येथे आहे. याठिकाणी सीईटीची अंतिम परीक्षा ५ मे रोजी होणार आहे. कणकवलीतील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये परीक्षा होणार आहे. परीक्षेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन एसएसपीएम कॉलेजचे रजिस्ट्रार सागर सईकर यांनी केले.बँकेच्या योजनांचा विद्यार्थ्यांना फायदाडॉ. मिलिंद कुलकर्णी म्हणाले, सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांचे मोठे भाग्य आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे, नीलम राणे यांच्या संकल्पनेतून शैक्षणिक उन्नतीसाठी इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी सुरू आहेत.जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या संकल्पनेतून थेट शेतकऱ्यांना, मुलांना फायदा होईल. अशा योजना बँकेच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत, हे स्तुत्य आहे.
गुणवत्ता सिद्ध करण्यास सीईटी सराव परीक्षा
By admin | Published: April 18, 2016 9:11 PM