कणकवली : फोंडाघाट बाजारपेठेतील साई कोल्ड्रींक्सचे मालक सचिन तायशेटे यांच्या भर बाजारपेठेतील दुकानात शुक्रवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास चोरीचा प्रयत्न झाला.संशयित आरोपी दीपक आनंदा सूर्यवंशी (१९, रा. कसबातारळे, ता. राधानगरी) व त्याचा एक साथीदार हे सचिन तायशेटे यांच्या दुकानात आले. त्या ठिकाणी त्यांनी सचिन यांच्याकडे विविध वस्तूंची मागणी केली. त्याचदरम्यान सचिन यांचे लक्ष नसल्याचे पाहत संशयित आरोपी दीपक याने दुसऱ्या संशयित आरोपीला दुचाकी चालू करण्याचा इशारा केला.
सचिन यांच्या गळ्यातील सुमारे दोन तोळ्यांची चेन हिसकावून घेत दुचाकीवर बसून फोंडाघाट बाजारपेठेतून भरधाव वेगाने गाडी कोल्हापूरच्या दिशेने पळविली. सचिन यांनी तत्काळ आपल्या मित्रांना चोरीच्या घटनेची माहिती देत फोंडाघाट तपासणी नाका गाठला. मात्र, त्याठिकाणावरून आरोपी पुढे निघून गेले होते.त्यानंतर फोंडाघाटमधील ग्रामस्थांनी फोंडाघाटपासून १५ किलोमीटरपर्यंत थरारक पाठलाग केला. दोन्ही संशयित आरोपींना चौकशीसाठी थांबविले असता त्यातील एक संशयित आरोपी काळोखाचा फायदा घेत जंगलात पळून जाण्यात यशस्वी झाला. तर दीपक याला चौकशीसाठी फोंडाघाट तपासणी नाक्यावरील पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
यावेळी दीपक याने आपणच चोरी केल्याचे कबूप करीत आपला दुसरा साथीदार हा राधानगरी तारळे येथीलच असून सध्या तो मुंबईत रहायला असल्याचे सांगितले.या प्रकरणी संशयित आरोपी दीपक सूर्यवंशी याच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.